(बालासोर)
चेन्नई येथून कोरोमंडल एक्सप्रेस ही पश्चिम बंगालच्या हावडा रेल्वे स्थानकाच्या दिशेला निघाली होती. या दरम्यान ओडिशाच्या बहनागा रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना घडली. तब्बल तीन रेल्वे गाड्यांची टक्कर झाली आहे. टक्कर इतकी जोरदार होती की कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरली. काल सायंकाळी हा भीषण रेल्वे अपघात घडला. हावडावरून चेन्नईकडे निघालेली कोरोमंडल एक्स्प्रेस एका मालगाडीवर आदळून झालेल्या भीषण अपघातात अनेक डबे मालगाडीवर चढले. मिळालेल्या माहितीनुसार सात डबे उलटले, चार डबे रेल्वे हद्दीबाहेर गेले. तर एकूण 15 डब्बे रुळावरून घसरले आहेत. या अपघातात आतापर्यंत 233 प्रवाशांच्या मृत्यू झाला आहे. तर 900 हून अधिक जण जखमी आहेत. घटनास्थळावर रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरु आहे.सध्या घटनास्थळी वेगाने बचावकार्य सुरू आहे. रेल्वे मंत्रालयाने या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख तर गंभीर जखमींना 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या अपघातानंतर पंतप्रधान मोदींनी तीव्र दुःख व्यक्त केले.
काल सायंकाळी 7 च्या सुमारास ओडिशाच्या बालासोर पासून 40 कि.मी. अंतरावर असलेल्या बहनागा रेल्वे स्थानकाजवळ तीन गाड्यांची टक्कर झाली. प्रथम दुरांतो एक्स्प्रेस एका मालगाडीला धडकली. त्यानंतर हावड्यातील शालिमार रेल्वे स्थानकातून चेन्नईला निघालेली कोरोमंडल एक्स्प्रेस मालगाडीवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, कोरोमंडल एक्स्प्रेसचे 15 डबे रुळावरून घसरले आणि पलटी झाले तर मालगाडीचेही 7 डबे पलटी झाले. दुरांतो मात्र बाजूच्या ट्रॅकवरून मालगाडीला घासून गेल्याने त्याचे फारसे नुकसान झाले नाही. सिग्नलमधील बिघाडामुळे मालगाडी व कोरोमंडल एक्स्प्रेस एकाच ट्रॅकवर आल्या आणि हा भीषण अपघात घडला. या अपघातानंतर प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला. या अपघाताची माहिती समजताच एनडीआरएफची बचाव पथके, पोलीस, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आणि बचाव कार्याला वेगाने सुरुवात झाली. प्रथम गाडीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी तात्काळ आपल्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याला आणि मुख्य सचिवांना घटनास्थळी पाठवले. त्यांनी बचाव कार्याचा आढावा घेतला. तसेच ट्रेनमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढून सोरो, गोपालपूर, घाटपाडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पंतप्रधानांना या अपघाताची माहिती दिली. त्यानंतर या अपघातातील मृत्युमुखी पडलेले आणि जखमींना मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच रेल्वेकडून हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आला.
दरम्यान रेल्वेने या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तर आज रेल्वेमंत्री तसेच ओडिशाचे मुख्यमंत्री घटनास्थळी जाणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही बचावकार्यासाठी काही टीम घटनास्थळी पाठवल्या आहेत. तसेच आपण ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहोत असेही ममता बॅनर्जी यांनी सांगितले. सध्या 60 रुग्णवाहिका घटनास्थळी असून, गाडीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलवले जात आहे. तसेच हा मार्ग बंद करण्यात आला आहे.
ओडिशाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने माहिती दिली की, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी एक दिवसीय राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे आज 3 जून रोजी संपूर्ण राज्यात कोणताही सण किंवा उत्सव साजरा होणार नाही.