(मुंबई)
लैंगिक शोषणाचे आरोप असलेले भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांना अध्यक्षपदावरून हटवण्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी रविवारी जबरदस्तीने हुसकावून लावले. यानंतर आक्रमक झालेल्या कुस्तीपटूंनी मंगळवारी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशासाठी कमावलेली पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतल्याने मोठा गदारोळ झाला. यामध्ये बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांचा समावेश होता.
हरिद्वारमधील गंगातीरी पोहोचताच हे कुस्तीपटू ओक्साबोक्शी रडू लागले. यावेळी भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी समजूत काढल्यानंतर कुस्तीपटूंनी आपला निर्णय मागे घेतला. कुस्तीपटूंसोबतच्या चर्चेनंतर टिकैत यांनी केंद्र सरकारला बृजभूषण सिंह यांच्या विरोधातील कारवाईसाठी ५ दिवसांचे अल्टिमेटम दिले आहे. अन्यथा ही पदके राष्ट्रपतींना सुपूर्द करण्यात येतील, असे ते म्हणाले. कुस्तीपटूंच्या निर्णयाला श्रीगंगा सभेने विरोध केला होता. गंगा हे श्रीक्षेत्र आहे. त्याला राजकारणाचा आखाडा बनवू नका, पदकांना अस्थी समजून विसर्जित करू नका, असे आवाहन श्रीगंगा सभेचे अध्यक्ष नितीन गौतम यांनी केले होते.
पंतप्रधान मोदींच्या मौनाने कुस्तीपटू संतप्त
पदक जिंकल्यानंतर चहापानाला बोलावून महिला कुस्तीपटूंचा आदर सत्कार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी अद्याप एक शब्दही उच्चारलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगातील प्रभावी नेता म्हणून ओळखले जाते, या प्रकरणावर त्यांच्या मौनाने कुस्तीपटू संतप्त झाले आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच यावर सकारात्मक व योग्य निर्णय घेतील, अशी आशा कुस्तीपटूंना लागून राहिली आहे