(मुंबई)
येत्या 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. मात्र शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच दोन ठिकाणी वेगवेगळे वर्धापन दिन साजरे केले जाणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना त्यांच्या निधनानंतर पुढे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थिरावली, विस्तारली. पण पुढे काहीच वर्षांमध्ये सेनेत अभूतपूर्व बंडाळी माजली आणि एकनाथ शिंदे यांच्या रुपाने नवे नेतृत्व उदयास आले. ठाकरे-शिंदे यांच्यातील दुफळी इतकी टोकाला गेली की, वाद निवडणूक आयोगाच्या दारात जाऊन पोहोचला आणि निवडणूक आयोगाने शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात दिली. सध्या शिवसेनेत दोन स्वतंत्र गट पाहायला मिळत असून त्यांच्यात संघर्षही टोकाचा होत आहे.
वर्धापन दिन कार्यक्रमाच्या निमित्तानेही हा संघर्ष पुढे आला आहे. येत्या 19 जून रोजी शिवसेना वर्धापन दिन साजरा होत आहे. आता मूळ शिवसेना कोणाची हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे. शिंदे गटाकडून आम्हीच मूळ शिवसेना असल्याचा दावा केला गेला. जो निवडणूक आयोगानेही मान्य केला. खरी शिवसेना कोणाची, भावनिक नाते असलेल्या उद्धव ठाकरे यांची की, एकनाथ शिंदे यांची याबाबत आता सामान्य शिवसैनिकांच्या मनातही संभ्रम आहे.
दरम्यान, दोन्ही पक्षनेतृत्वांकडून आपापल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांना वर्धापन दिन साजरा करण्याचे आदेश गेल्याचे समजते. त्यामुळे दोन्ही गटाचे नेते आपापल्या पक्षाचा वर्धापन दिन दणक्यात साजरा करण्यासाठी कामाला लागले आहेत. तशी तयारीदेखील सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाची वर्धापन दिनासाठी तयारी आधीपासूनच सुरु झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाकडूनही वर्धापन दिन कार्यक्रमासाठी जोमाने प्रयत्न करत आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 18 जून रोजी मुंबई आणि राष्ट्रीय कार्यकारणी आणि राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीतच उद्धव ठाकरे यांची पक्ष प्रमुख म्हणून फेरनिवड केली जाण्याची शक्यता आहे. याबाबत कायदेतज्ज्ञांनी सल्लामसलत सुरु असून लवकरच निश्चित धोरण ठरवले जाणार असल्याचे समजते. वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा केंद्रांत ही बैठक होणार आहे. या सभेत काय ठरते याबाबत उत्सुकता आहे.
उद्धव ठाकरेकडून पक्षाच्या वर्धापन दिनाची जबाबदारी ही मुंबईतील विभागप्रमुखांकडे सोपवण्यात आली आहे. पुढच्या आठवड्यात ठाकरे गटाचे प्रमुख नेते वरळी येथील NSCI डोम कार्यक्रम ठिकाणी भेट देणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा वर्धापन दिन हा आंनदोत्सव म्हणून साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या नेत्यांची देखील बैठक नुकतीच पार पडली. शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिवस हा मुंबईतील नेस्को सेंटर येथे पार पडणार आहे. शिवसेनेचे सर्व आमदार, मंत्री त्याचबरोबर प्रतिनिधींकडून या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात येणार आहे.