(संगमेश्वर / प्रतिनिधी )
श्री क्षेत्र शृंगारपूर श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, २१ वा वार्षिक सोहळा, म्हस्केवाडी शृंगारपूर, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी (महाराणी येसूबाई यांचे माहेर) येथे चार दिवस पर्यावरण पूरक, प्लास्टिक मुक्त हरी नाम सप्ताह सोहळा नुकताच संपन्न झाला.
हा सोहळा पूर्णपणे पर्यावरण पूरक, प्लास्टिक मुक्त करण्याचा मानस कार्यकर्त्यांनी केला होता. त्याप्रमाणे स्थानिक, मुंबई व पुणे येथील कार्यकत्यांनी नियोजन करून तो यशस्वी केला. विशेष म्हणजे या सोहळ्यात श्री मनेश म्हस्के यांनी कीर्तन चालू होण्यापूर्वी कीर्तन सांगणाऱ्या सर्व महाराज यांना हरीत घर पत्रक देऊन पर्यावरण संरक्षण गतीविधी बद्दल सविस्तर माहिती दिली, व किर्तनामार्फत प्रबोधन कारणासाठी विनंती केली.
विनंतीला मान देऊन सर्व महाराज यांनी या भक्तिमय सोहळ्यात चार दिवस हरितघर संकल्पनेचे मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये पाणी, प्लास्टिक, व वृक्ष याचे आपल्या नित्य उपयोगातील महत्त्व व त्याचे फायदे तोटे सांगितले. एकादशी दिवशी भाविकांची उपस्थित जास्त असल्याने कीर्तन संपल्यानंतर रात्रीचा महाप्रसाद चालू असताना श्री मनेश म्हस्के यांनी हरित घर, इको ब्रिक्स, होम कम्पोस्टिंग व एक पेड देश के नाम बद्दल सविस्तरपणे माहिती दिली. या वर्षीचा हरी नाम सप्ताह हा प्रथमच प्लास्टिक मुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला व त्यामध्ये ७० – ७५ टक्के पर्यंत यश मिळाले. पुढील वर्षी नक्कीच १०० % पर्यावरण पूरक सोहळा करण्याचे नियोजन करणार असे मंडळाचे अध्यक्ष प्रताप म्हस्के यांनी सांगितले.
मागील गणेशोत्सवात मनेश म्हस्के यांनी त्यांच्या घरी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लोकांना आवाहन करणाऱ्या प्रदर्शानीची मांडणी केली होती, घरी शाडू मातीची मूर्ती बसवली होती. त्याचबरोबर यावर्षीही शाडूमातीची मूर्ती सर्वांनी घरोघरी बसवावी यासाठी सोशल मिडिया मार्फत सर्वाना आवाहन करत आहेत.