(रत्नागिरी)
युवा पिढीला आदर्श करण्यासाठी आपल्या फाऊंडेशन उपयोग होणार असेल, तर त्यासाठी लागेल ती ताकद आपण लावू, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. स्वयंवर मंगल कार्यालय, रत्नागिरी येथे चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांच्या इंग्रजी Dhananjay Keer – Life Sketch of Great Biographer व चरित्रकार धनंजय कीर या चरित्र ग्रंथांचे मराठी सुधारित आवृत्तीचे प्रकाशन उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रविवारी झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. या पुस्तकांचे लेखक राजेंद्रप्रसाद मसुरकर आहेत.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी कुलगुरु कोकण कृषी विद्यापीठ दापोली डॉ.श्रीरंग कद्रेकर, ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक विजय कुवळेकर, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे, डॉ.सुनील किर, उद्योजक दिलीप भाटकर, डॉ. धनंजय कीर यांची नात डॉ.सायली नार्वेकर, दत्तात्रय वालावरकर, जयू भाटकर आदि मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.सामंत म्हणाले, पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांच्या कार्याचा गौरव करताना रत्नागिरी येथील विद्यापीठाच्या उपकेंद्राला पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांचे तर रत्नागिरीच्या प्रवेशद्वाराला दानशूर भागोजीशेठ कीर यांचे नाव देण्यात आले. विद्वान लोकांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे आपल्या समोर उभे राहिले तर भावी पिढीला आदर्शवत ठरणार आहे. युवा पिढीला आदर्श निर्माण करण्यासाठी आपल्या फाऊंडेशन उपयोग होणार असेल त्यासाठी लागेल ती ताकद आपण लावू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांचा वारसा पुढे नेत असताना त्यांनी दिलेल्या वाटेवर प्रामाणिकपणे चालण्याचा आम्ही करु, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, उदय सामंत फाऊंडेशन तर्फे गौरव चरित्रकाराचा या कार्यक्रमांतर्गत चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांच्या दोन ग्रंथाचे प्रकाशन हा पहिला कार्यक्रम घेण्यात आला. अशा प्रकारचे कार्यक्रम हा आपल्या आयुष्यातील सुवर्ण क्षण आहे. आपल्याला भूषणावह आहे. या फाऊंडेशनचा पाया आपण एवढा मजबूत करु या की, रत्नागिरीकरांना कोणतीही अडचण भासली आणि ती उदय सामंत फाऊंडेशनकडे आली तर त्यांचे काम तात्काळ होऊ शकेल. अशा प्रकारे उदय सामंत फाऊंडेशनचे काम केले तर आपल्याला समाधान होईल.
नाव नसताना या फाऊंडेशनने हेल्थ मध्ये काम केले आहे. जिल्हयामधील 0 त 6 वयोगटातील ह्रदयाला छिद्र असणारी 134 मुले शोधून सापडली. त्यापैकी 60 ते 70 मुले उपचार घेऊन बरी झाली, 8 दिवसात 45 मुलांची याच फाऊंडेशनच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. या फाऊंडेशनच्या माध्यमातून 3-4 महिन्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रत्नागिरीतच नाही तर महाराष्ट्रात 5 ते 6 कोटी रुपयांची मदत केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
या पुस्तकांचे लेखक राजेंद्र प्रसाद मसुरकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांची नात डॉ.सायली नार्वेकर यांनी लिहिलेल्या “पीएचडी बघावी करुन” या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तद्नंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी माध्यमिक शिक्षक कर्मचारी पतसंस्था, साळवी स्टॉप येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळयास उपस्थिती लावली व वधूवरांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.