(श्रीनगर)
अमरनाथची यात्रा यंदा १ जुलैपासून सुरू होणार आहे. अनंतनाग जिल्ह्यातील ४८ किलोमीटरच्या नुनवान-पहलगाम मार्गावर आणि गंदरबल जिल्ह्यातील १४ किलोमीटरच्या बालटाल मार्गावरून होणार्या या यात्रेच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत
आरोग्य सेवा संचालक राजीव शर्मा यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, श्री अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर १९ जूनपासून प्रसूती रजा आणि वैद्यकीय कारणासाठी दिलेल्या रजा वगळता डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचार्यांच्या इतर सर्व सर्व प्रकारच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. १ जुलैपासून सुरू होणारी ही यात्रा ३१ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
यात्रेकरूंची पहिली तुकडी यात्रा सुरू होण्याच्या एक दिवस आधी जम्मू बेस कॅम्पवरून काश्मीरला रवाना होण्याची अपेक्षा आहे. यासाठी मुख्य वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक आणि ब्लॉक वैद्यकीय अधिकार्यांना प्रवासाच्या कालावधीत पुरेशा कर्मचारी सदस्यांची उपलब्धता निश्चित करण्यासाठी डॉक्टर आणि पॅरामेडिकच्या रजेचे अर्ज मंजूर करू नयेत, असे निर्देश देण्यात आल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे.