रत्नागिरी : कोरोना व्हायरसमुळे उदध्वस्त झालेल्या पर्यटन व्यावसायिकांना असलेली शासनाच्या भरीव आर्थिक मदतीची व पॉलिसीची गरज ओळखून केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग मंत्री ना. नारायण राणे यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी निवेदनातून केली आहे.
निवेदनात श्री. भाटलेकर यांनी म्हटले की, गेल्या दीड वर्षात कोरोना व्हायरसमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार, व्यापारी, मच्छीमार, पर्यटन व्यावसायिक उदध्वस्त झाला आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सागरी पर्यटनासाठी दरवर्षी १५ लाखापेक्षा जास्त पर्यटक भेट देत असतात. यावर येथील होमस्टे, लॉजिंग, बोर्डिंग, हॉटेल, जलक्रिडा, वाहनधारक व्यावसायिकांचा व्यवसाय चालतो. परंतु कोरोना व्हायरसमुळे या भागातील व्यवसाय बंद असल्याने व्यवसाय देखभाल, कामगार पगार, शासकीय कर, पाणी बिल, लाईट बिल, वाहन कर्ज, गृह व व्यवसाय कर्ज भरणार कुठून हा यक्ष प्रश्न पर्यटन व्यावसायिकांसमोर उभा आहे.
कोरोना व्हायरसची जागतिक आरोग्य संघटनेने सूचित केल्याप्रमाणे तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णसंख्या वाढ होण्यास सुरवात झाली असून पर्यटन व्यावसायिकांचे पुढील आर्थिक नियोजन होणार कुठून हा प्रश्न उभा असून या कठीण प्रसंगात शासनाकडून स्थानिक पर्यटन व्यावसायिकाना मदतीची अपेक्षा असून पर्यटन व्यावसायिकांना त्यांच्या कामगार हॉटेल देखभाल खर्चासाठी सानूग्रह आर्थिक अनुदान देण्यात यावे, लाईट बिल, शासकीय कर, बँक कर्ज भरण्यास मुदत वाढ देण्यात यावी, सर्व प्रकारची कर्ज पुनर्गठीत करून गेल्या दोन आर्थिक वर्षातील कर्जावरील व्याज राज्य सरकारने अनुदान स्वरूपात पर्यटन व्यावसायिकांस माफ करावे आणि व्यावसायिकांच्या कर्जाच्या २० टक्के रक्कम येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात पर्यटन व्यावसायिकांना व्यवसाय उभारण्यासाठी देण्याचे आदेश जिल्ह्यातील बँक, वित्तीय संस्था यांना देण्याचे आदेश शासनाने द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.