(रत्नागिरी)
ग्रामपंचायतींच्या कामकाजामध्ये एकसूत्रीपणा व प्रशासकीय गतीमानता आणणे व नागरिकांना सूलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये महा ई ग्राम प्रणालीचा वापर करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत.
ग्रामीण पातळीवरील भौतिक विकासाचे नियोजन करण्यासाठी पंचायत समित्या, जिल्हा परिषद व राज्य शासनाला पायाभूत सुविधांची माहिती सहजरित्या उपलब्ध व्हावी, यासाठी ग्रामविकास विभागाने महा ई ग्राम प्रणाली विकसित केली आहे.
ग्रामपंचायतीकडील नमुना नं १ ते ३३ संगणकीकृत करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सन २०२३ २४ पासून कराची फेर आकारणी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतीचे नमुना नं. ८ मधील तपशील महा ई ग्राममध्ये नोंदवण्यासाठी कालबध्द मोहीम राबवावी.
अन्य खासगी संगणक प्रणाली न वापरता पूर्ण महा ई ग्राम ही प्रणालीच वापरण्यात यावी. ग्रामपंचायत स्तरावरील मुलभूत सुविधांची एकत्रीत माहिती प्रशासकीय यंत्रणांना मिळणार आहे. ऑनलाईन कर भरणा सुविधा ॲपच्या माध्यमातून निर्माण करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीचा मासिक प्रगती अहवाल महा ई ग्राममध्ये दरमहा ५ तारखेपूर्वी भरावा लागणार आहे. महा ई ग्राम प्रणालीच्या वापरामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायती पेपरलेस होणार आहेत.
महा ई ग्रामच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना देण्यात येणार्या सेवा गतीने देण्यास मदत होणार आहे. केंद्र शासनाच्या शाश्वत विकासाच्या ध्येयाशी संबंधित सुशासनयुक्त गाव ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणणे शक्य होणार आहे.
महा ई ग्राम प्रणालीचा ग्रामपंचायत स्तरावर तत्काळ वापर करावा. या प्रणालीच्या वापराबाबत ग्रामसेवक व केंद्र चालकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच प्रणाली वापराचा व जिल्ह्याच्या प्रगतीचा नियमितपणे आढावा घेण्यात येणार आहे.