(मुंबई)
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ४ हजार ८३ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या हस्ते आज ‘गो – लाईव्ह’ कार्यक्रमांतर्गत करण्यात आला. सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत कार्यक्रम १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात आयोजित करण्यात येणार आहे.
वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील मंडळाचे मुख्य अधिकारी यांच्या कार्यालयाच्या समिती सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी सदनिका सोडतीसंदर्भातील माहिती पुस्तिकेचे अनावरणही करण्यात आले. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्याकरिता नियमावली, मार्गदर्शक सूचना, सदनिकांचे विवरण, पात्रतेचे निकष व आरक्षण प्रवर्ग यांबाबत माहिती या पुस्तिकेत नमूद करण्यात आली आहे. ही पुस्तिका https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर क्विक लिंक या विंडो मध्ये इच्छूक अर्जदारांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सोडतीचा शुभारंभ केल्याच्या दहा मिंनिटांमध्ये सुमारे ११५ अर्ज सोडत प्रणालीत प्राप्त झाले व सहा अर्जदारांनी पेमेंट देखील केले. नवीन सोडत प्रक्रिया ही अत्यंत सुलभ आणि सोपी केली असल्याने अधिकाधिक नागरिक यामध्ये सहभाग घेतील असा विश्वास श्री बोरीकर यांनी यावेळी व्यक्त केला.