(बंगळुरु)
आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचविण्यासाठी विराट कोहली लढला आणि त्याने शानदार शतक झळकावले. परंतु त्याचे शतक वाया गेले. कारण शुभमन गिलच्या शतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सने आरसीबीचा पराभव केला. त्यामुळे आरसीबीचा संघ स्पर्धेच्या बाहेर गेला आणि मुंबई इंडियन्सचा संघ प्ले ऑफमध्ये दाखल झाला. गुजरात टायटन्सने आयपीएलच्या या रोमांचक सामन्यात आरसीबीचा ५ गडी राखून पराभव केला.
लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात चांगली झाली नाही. गुजरातने ऋद्धिमान साहाची विकेट स्वस्तात गमावली. साहाला मोहम्मद सिराजने वेन पारनेलच्या हाती झेलबाद केले. येथून शुभमन गिल आणि विजय शंकर यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२३ धावांची भागीदारी करत गुजरातला मजबूत स्थितीत आणले. शंकरने ३५ चेंडूंत ७ चौकार आणि दोन षटकारांसह ५३ धावा केल्या. शंकर बाद झाल्यानंतर गुजरातने दासून शनाका आणि डेव्हिड मिलर यांच्या विकेट्स स्वस्तात गमावल्या.
आरसीबीच्या फलंदाजीत विराट कोहली पूर्णपणे प्रभाव टाकताना दिसला. कारण सुरुवातीपासून कोहलीने दमदार फटकेबाजी केली. मात्र, कोहलीला समर्थ साथ मिळू शकली नाही. फॅफ २८ धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल हा ११ धावांवर बाद झाला. आरसीबीसाठी हा एक मोठा धक्का होता. कारण आरसीबीने दोन्ही धडाकेबाज फलंदाज गमावले होते.
त्यानंतर फलंदाजीला महिपाल लोमरोर फक्त एकच धावा करू शकला. त्यानंतर फलंदाजीला आलेला ब्रेसवेल २६ धावांवर बाद झाला. यावेळी दिनेश कार्तिककडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. त्याला एकदाही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. पण कोहली एकटा गुजरातच्या संघाला भिडल्याचे पाहायला मिळाले. त्याने ६१ चेंडूंत १३ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १०१ धावांची खेळी साकारली. त्यामुळे आरसीबीच्या संघाला १९७ धावा करता आल्या. यापूर्वी त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्धही शतक (१०० धावा) केले होते. किंग कोहली आता आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू बनला आहे. कोहलीने सहा शतके झळकावणाऱ्या ख्रिस गेलला मागे टाकले. त्यानंतर मैदानात उतरलेल्या गुजरात संघाचा सलामीवीर शुभमन गिल याने जोरदार फटकेबाजी करीत शतक झळकावले आणि गुजरातला विजय मिळवून दिला. त्यामुळे आरसीबीच्या प्लेऑफच्या स्वप्नाचा चुराडा झाला. पर्यायाने मुंबईला प्लेऑफची संधी मिळाली. कारण मुंबईने हैदराबादवर विजय मिळविला होता.