(पाचल / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील पाचल बाजारपेठेत होणारी बेशिस्त वाहन पार्कींग आणि त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडी विरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांनी वाहन चालकांची बैठक घेवून वाहतुकीला अडथळा होणार नाहीत, अशा प्रकारे वाहने उभी करावीत अन्यथा कारवाई करण्याचा ईशारा दिला आहे.
राजापूर तालुक्यातील सर्वात जास्त वर्दळीचे ठिकाण असलेल्या पाचल बाजारपेठेतील जवळेथर तिठा परिसरात रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे बाजारपेठेत येणाऱ्या नागरीकांसह, व्यापारी, वाहन चालकांनाही त्रास सहन करावा लागतो. तसेच जवळेथर तिठ्यावर खासगी बस उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीला अडथळा होत असल्याची तक्रार पाचल व्यापारी संघटनेनेही केली होती.
या पार्श्वभूमीवर राजापूर पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायपाटण पोलीस दुरक्षेत्राचे पो. कॉ.निलेश कात्रे, भिम कोळी, नितीन भानवसे यांनी पाचल ग्रामपंचायतीच्या वतीने खासगी बस, टेम्पो यासह लहान मोठे वाहन चालक यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत वाहन चालकांनी आपली वाहने रस्त्याच्या एका बाजुला वाहतुकीला अडथळा ठरणार नाहीत अशा पध्दतीने पार्क करण्याच्या सूचना केल्या. तसेच जर कोणी बेशिस्तपणे वाहतुकीला अडथळा होईल असे वाहन पार्क केल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी यावेळी दिला आहे.