( नवी दिल्ली )
एप्रिलमध्ये किरकोळ महागाई दर १८ महिन्यांतील सर्वात कमी ४.७ टक्क्यांवर आल्यानंतर आणखी एक मोठा दिलासा मिळणार आहे. साबण, तेल, पेस्ट यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या (एफएमसीजी) किमती कमी होणार आहेत. बड्या एफएमसीजी कंपन्यांच्या सीईओंनी तसे संकेत दिले आहेत.
हिंदुस्तान युनिलिव्हर, ब्रिटानिया, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स आणि मॅरिको यांसारख्या नोंदणीकृत कंपन्यांच्या सीईओंनी म्हटले की, तृणधान्ये आणि खाद्यतेलासारख्या कच्च्या मालाच्या किमती कमी झाल्यामुळे त्यांच्या कमाईत वाढ झाली. त्याचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. तांबे आणि अॅल्युमिनियमसारख्या कच्च्या मालाच्या किमती स्थिर झाल्याने व्होल्टास, हॅवेल्स आणि ब्लू स्टारसारख्या कंपन्यांनी एसी, फ्रिजसारख्या उत्पादनांच्या किमती वाढविणार नसल्याचे सांगितले. व्होल्टाससारख्या कंपन्यांनी किमती वाढवू शकतात, असे यापूर्वी सांगितले होते.
विक्रीवर लक्ष ठेवणारी संस्था नीलसन आयक्यूच्या मते दीड वर्षाच्या घसरणीनंतर जानेवारी-मार्चमध्ये प्रथमच ग्रामीण भागातील खप ०.३% वाढला आहे. तथापि, शहरी भागात विक्री वाढ ५.३% वर सपाट राहिली. रिटेल असोसिएशन ऑफ इंडियाच्या मते एप्रिलमध्ये किरकोळ क्षेत्रातील विक्री ६% वाढली.
यामुळे कंपन्यांकडून किंमत कमी होणार
-आर्थिक वर्षात कंपन्यांसाठी महागाई दर ३-४% पर्यंत खाली येण्याची अपेक्षा
-मार्चपर्यंतच्या २ आर्थिक वर्षांत एफएमसीजी कंपन्यांसाठी महागाई ३०% वर पोहोचली होती
-जानेवारी-मार्च तिमाहीत कच्च्या मालाची महागाई आधीच ६-७% पर्यंत खाली आली
-एफएमसीजी कंपन्या आता मार्जिनऐवजी विक्री वाढवून उत्पन्न वाढवण्यावर भर देतील