(मुंबई)
वनविभागाच्या जमिनीवर वाढीव बांधकाम केल्याने, त्याविरोधात कारवाई न करण्यासाठी एका वनपालाने पाच लाखांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी अडीच लाख रुपये घेताना मांडवी वन परिमंडळाच्या वनपालाला त्याच्या साथीदारासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.
रज्जाक रशिद मन्सुरी असे वनपालाचे नाव असून दानियाल हाजी खान असे त्याच्या साथिदाराचे नाव आहे. तक्रारदाराने वनजमिनीवर वाढीव बांधकाम केले होते. त्याविरोधात वनपाल रज्जाक रशिद मन्सुरी याने कारवाई न करण्यासाठी दानियाल खानच्या मार्फत पाच लाख रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. त्यावरून सापळा रचण्यात आला होता.
तक्रारदाराने बुधवारी दुपारी दानियाल खानकडे लाचेपैकी अडीच लाख रुपयांचा पहिला हप्ता दिला. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दानियाल हाजी खानला ताब्यात घेतले. त्यानंतर रज्जाक मन्सुरीलाही पथकाने अटक केली. मन्सुरी आणि खानविरोधात मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक अश्विनी पाटील, हवालदार पाटील, मदने, घोलप, चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.