(बंगरुळू)
कर्नाटक काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी अशुभ समजल्या जाणाऱ्या राहू काळात आपला उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांनी थेट स्मशानातून प्रचार सुरु केला. त्यानंतर ते निवडूनही आले. यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जारकीहोळी यांचे कौतुक केले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी काँग्रेसचे प्रदेशकार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांचे जाहीर अभिनंदन केले.
कृष्णा चांदगुडे म्हणाले, “आपले राजकारणी यांना उठता बसता ज्योतिषी ,बुवा-बाबा पाहिजे असतात. स्वतः अंधश्रद्ध असल्यास जनतेला ते काय संदेश देणार? त्यांनी या घटनेतून बोध घेऊन अंधश्रद्धेतून बाहेर पडले पाहिजे.” चांदगुडे यांना नाशिक येथे होणाऱ्या अंधश्रद्धा निर्मुलनाच्या कार्यक्रमासाठी येण्याची विनंतीही जारकीहोळी यांना केली. सतीश जारकीहोळी २००८ पासून यमकनमर्डी मतदारसंघाचे आमदार म्हणून काम करत आहेत. सिद्धारामय्या आणि कुमारस्वामी यांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. कर्नाटकात अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यकर्ते म्हणूनही ते काम करतात.