(राजापूर)
आम्ही गिरगावकर या सामाजिक संस्थेने महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरवस्थेला सुधारण्यासाठी ‘रंग दे माझी शाळा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. राजापूर तालुक्यातील रायपाटण, ताम्हाणे आणि वाकेड या शाळा निवडण्यात आल्या आहेत. यामुळे या शाळेच रूपडे बदलणार आहे. शासकीय कचाट्यात न सापडता स्वतःहून मुलांना ज्या विद्याप्रांगणात शिक्षण मिळते ती जागा प्रसन्न असावी असे ध्येय समोर ठेवून मुंबईतील आम्ही गिरगावकर ही सामाजिक संस्था हा उपक्रम राबवत आहे.
गेल्या दोन वर्षात राज्यातील शेकडो शाळांच रंगरूप पालटून त्या प्रसन्न आणि बहारदार करून दाखविल्या आहेत. यामुळे सद्या राज्यभर या उपक्रमाची चर्चा आहे. या उपक्रमांतर्गत राजापूर तालुक्यातील रायपाटण, ताम्हाणे आणि वाकेड या ३ नादुरुस्त जिल्हा परिषद शाळांची डागडुजी करण्यात येणार असून, या शाळांचे रंगसाहित्य नुकतेच शाळांना प्राप्त झाले आहे. प्रमोद तरळ जबाबदारी संभाळत आहेत. ठाकरे गटाचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान आणि सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांचे या उपक्रमाला विशेष सहकार्य लाभले आहे.