(नाशिक)
नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत तक्रारदार संचालका विरोधातील सुनावणीमध्ये मदत करण्यासाठी 30 लाख रुपयांची लाच घेताना जिल्हा उपनिबंधकासह अन्य एका वकील व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.
सतिश भाऊराव खरे (५७, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक वर्ग-१) रा. आई हाईट्स, कॉलेज रोड), वकील शैलेश सुमातीलाल सभद्रा (३२, रा. उर्वी अपार्टमेंट, सौभाग्यनगर, गंगापूर रोड) अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत.
नुकत्याच कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुका पार पडल्या. जिल्ह्यातील एका बाजार समितीमध्ये तक्रारदार हे संचालकपदी कायदेशीर व वैधपणे निवडून आले आहेत. त्यांच्या निवडीविरुद्ध उपनिबंधक खरे यांच्याकडे तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणावर सुनावणी घेण्यासाठी व निकाल संचालकाच्या बाजूने देण्यासाठी लाचखोर खरे आणि त्याचा वकील एजंट सभद्रा यांनी तब्बल ३० लाख रुपयांची लाच मागितली होती.
सदरची लाचेची रक्कम घेऊन खरे यांनी तक्रारदारास सोमवारी रात्री कॉलेज रोडवरील त्यांच्या राहत्या घरी बोलावले होते. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि तक्रारदाराकडून तीस लाखांची लाच घेताना खरे व त्यांच्या साथीदारास लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली.