(पुणे)
पुण्यातील खडकवासला धरणात सकाळी पोहायला गेलेल्या नऊ मुलींपैकी दोघींचा बुडून मृत्यू झाला. तर सात मुलींची सुखरूप सुटका करण्यात आली. सोमवारी नऊ मुली गोरे बुद्रुक येथील कलमाडी फार्मच्या मागील बाजूस खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेल्या होत्या. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील काही जणी बुडू लागल्या. त्यांच्यातील काही जणींनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तेथे जवळच दहाव्यासाठी जमलेल्या गावकरी हा आरडाओरडा ऐकून धावत गेले. त्यांनी बुडत असलेल्या ७ मुलींना पाण्याबाहेर काढले.
मात्र, दोन मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर अग्निशमन पीएमआरडीएचे अग्निशमन दलाला याबाबत माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळाताच हवेली पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जवानांनी सुरू केलेल्या शोध मोहिमेत २ मुलींचे मृतदेह सापडले असून त्यांना पाण्याबाहेर काढण्यात आले. मूळ बुलढाण्याच्या रहिवासी असलेल्या नऊ मुली या खडवासला येथे एका घरगुती समारंभासाठी आल्या होत्या.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खडकवासला चौपाटी व सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. रविवार आणि सोमवारी दोन दिवस दोन्ही ठिकाणी जाण्यास बंदी होती. त्यामुळे या मुली खडकवासला धरणात पोहायला कशाप्रकारे गेल्या हा प्रश्न निर्माण झाला आहे. आता खडकवासला धरण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.