(मुंबई)
राज्य सरकारच्या ४३ विभागाअतंर्गत तब्बल पावणेतीन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनुसार सदर पदे १ जून ते १५ ऑगस्ट या अडीच महिन्यांत ७५ हजार पदांची मेगाभरती केली जाणार आहे. भरतीच्या प्रतीक्षेत हजारो तरूणांची वयोमर्यादा देखील संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता मेगाभरतीचा कृती आराखडाच शासनाने तयार केला असून १५ ऑगस्टपूर्वी मेगाभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध करून प्रक्रिया सुरु होईल, असे समजते.
राज्यात सत्तेवर आल्यानंतर दुसऱ्याच महिन्यात (ऑगस्ट २०२२) शिंदे- फडणवीस सरकारने मेगाभरतीची घोषणा केली होती. कालबद्ध पद्धतीने १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी भरती पूर्ण करण्याचेही जाहीर केले होते. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची तब्बल ६७ हजार पदे रिक्त आहेत. रिक्तपदांमुळे गुणवत्तेवर परिणाम झाला असून पटसंख्याही कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर २०२२-२३ ची संचमान्यता अंतिम झाल्यावर जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांसह खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची ३० ते ३२ हजार पदे ऑगस्ट २०२३पूर्वी भरली जाणार आहेत.
जिल्हा परिषदांमधील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्वी जिल्हा परिषद पातळीवरच होत होती. पण, राज्य सरकारने तो निर्णय बदलून राज्यस्तरीय भरतीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे जिल्हा परिषदांचा पूर्वीचा कर्मचारी भरतीचा अधिकार संपुष्टात आला होता. परंतु, आता पूर्वीप्रमाणेच जिल्हा परिषद पातळीवरच कर्मचारी भरती होईल. सर्व जिल्हा परिषदांमध्ये एकूण १८ हजार ९३९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. मे अखेरीस ग्रामविकास विभागाकडून त्यासंबंधीचे आदेश निघणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच मेगाभरतीची घोषणा केली आहे. १५ ऑगस्टपूर्वी विविध विभागांमधील रिक्त पदे भरण्याचे नियोजन सुरु आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी पुन्हा एकदा चर्चा करून भरतीची प्रक्रिया लवकर सुरु करण्यासाठी प्रयत्न राहील असे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.