(ठाणे)
ठाण्यातील उपवन तलावात चार दिवसापूर्वी ६७ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला होता. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी एका ३० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने उपवन परिसरात खळबळ उडाली. या व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. उपवन तलावात मृतदेह तरंगत असल्याचे स्थानिकांना समजले. याची माहिती स्थानिकांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. व्यवस्थापन विभागाच्या पथकाने तलावातून या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला. या व्यक्तीची ओळख पटलेली नाही.
चार दिवसापूर्वी ठाण्याच्या उपवन तलावातील नौका विहार आणि गणपती मंदिराच्या बाजूला ६७ वर्षीय महिलेचा मृतदेह तरंगताना आढळला होता. सोमवारी (ता. ८) सकाळी ८-११ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. सुलोचना विठ्ठल खोचरे असे मृत महिलेचे नाव होते. उपवन तलाव मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.