(मुंबई)
सर्व शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या ५६ लाख विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. शासनाने समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक ही योजना सुरू केली आहे.
यानुसार कोकण विभागात १३ लाख ११ हजार ८३२ विद्यार्थ्यांना, उत्तर महाराष्ट्रात ९ लाख, मराठवाडा विभागात १० लाख १२ हजार, विदर्भात १४ लाख, पश्चिम महाराष्ट्रात १० लाख अशी एकूण ५६ लाख विद्यार्थ्यांना पुस्तके वितरित होणार आहेत. यामध्ये जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी, खासगी अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या विद्यार्थ्यांना पुस्तके वितरित करण्यात येणार आहेत. नव्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे सर्व विषय एकाच पुस्तकात असून, पुस्तकांचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे; मात्र पुस्तकांना वह्यांची पाने जोडण्याचा निर्णय रहित करण्यात आला आहे. एकच पुस्तक याप्रमाणे एकाच वहीवर सर्व विषयांचा अभ्यास करता येणार आहे, त्यामुळे पुस्तकांचे ओझे कमी करण्याच्या संकल्पनेला बळ मिळणार आहे.
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यासाठी पुस्तके शिक्षण विभागाकडे उपलब्ध झाली असून ही पुस्तके तालुकास्तरावरील गटशिक्षण अधिकाऱ्याकडे देण्यात येतील तेथून केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापकांकडे पुस्तके पोहोचवण्यात येणार असून विद्यार्थ्यांना सर्व पुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी देण्यात येणार आहेत.
ग्रामीण व शहरी भागातील जिल्हा परिषद, नगरपालिका शाळा आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांनी बाजारातून पुस्तके खरेदी करू नये. पाठ्यपुस्तके सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी उपलब्ध करून दिली जाणार आहे असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.