( मुंबई )
राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने आज निकाल दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण कोर्टाने विधानसभेच्या अध्यक्षांकडे दिलं आहे. तसेच नव्या विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाचा व्हीप आणि प्रतोद यांची बेकायदेशीर निवड केल्याची टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भगतसिंह कोश्यारी आणि शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. याशिवाय राजीनामा दिला नसता तर आम्ही उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं असतं, या टिप्पणीवरही ठाकरेंनी भाष्य केलं आहे.
आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे जरी सोपवला असला तरी पक्षादेश हा माझ्या शिवसेनेचाच राहील असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदयांनी देखील आता यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी करणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. सत्तेसाठी हपापलेल्यांना चपराक देणारा हा निकाल आहे, असेही यावेळी ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले, हा जो निकाल दिला आहे त्यामध्ये एकूणच सत्तेसाठी हपापलेल्या लोकांचे उघडे-नागडे राजकारण याची कोर्टाने चिरफाड केली आहे. खरे म्हणजे राज्यपालांची भूमिका अयोग्य होती असे कोर्टाने म्हटले आहे, त्यामुळे राज्यपाल व या यंत्रणेचे वस्त्रहरण झाले आहे. हे राज्यात आणि दिल्लीबाबतही घडले आहे.
अपात्रतेचा निर्णय त्यांनी अध्यक्षांकडे जरी सोपवलेला असला तरी पक्षादेश हा माझ्या शिवसेनेचाच राहील. आता अध्यक्षांनी देखील यामध्ये वेळ न घालवता यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा. कायदेशीरदृष्ट्या मी राजीनामा दिला हे चुकीचेच असेल पण नैतिकतेच्या दृष्टीने पाहिले तर ज्या लोकांना माझ्या पक्षाने विश्वास दाखवला आणि त्यांनी गद्दारी केली त्यांच्यावर मी विश्वास का दाखवू? असा सवाल त्यांनी केला.
ज्या लोकांना मी सर्व काही दिलं त्या लोकांनी माझ्या पाठित खंजीर खुपसावा आणि त्यांनी माझ्याविरोधात अविश्वास ठराव आणावा हे मला मान्य नाही. गद्दार आमदारांच्या विरोधात मी विश्वासदर्शक ठराव मांडू तरी कसा?, विश्वासघात करणाऱ्यांकडून माझ्यावर अविश्वासदर्शक ठराव यावा हे मला मान्य नव्हतं, त्यामुळंच मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
आज तर राज्यात सरकारच नाही, त्यामुळे जसे मी नैतिकतेचे पालन केले त्याप्रमाणे सध्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये थोडी देखील नैतिकता असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, जसा मी दिला होता, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.