अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतील मॅनहॅटन फेडरल न्यायालयाने लैंगिक शोषण प्रकरणात दोषी ठरवले आहे. मंगळवारी न्यायालयाच्या ९ सदस्यीय खंडपीठाने ट्रम्प यांना लैंगिक शोषण आणि मानहानीप्रकरणी ५० लाख डॉलर्सचा (अंदाजे ४१ कोटी रुपये) दंड ठोठावला आहे. हे प्रकरण १९९०च्या दशकातील असून एका मासिकाच्या लेखिका ई. जीन कॅरोल यांच्या लैंगिक अत्याचाराशी संबंधित आहे. २०२४ मध्ये होणारी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
ट्रम्प यांच्या विरोधातील या खटल्याची सुनावणी २५ एप्रिलपासून सुरू झाली होती. १९९० मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मासिकाच्या लेखिका ई. जीन कॅरोल या महिलेवर लैंगिक अत्याचार केले आणि नंतर त्या महिलेची बदनामीदेखील केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.
७९ वर्षीय कॅरोल यांनी आपल्या जबाबात म्हटले की, ७६ वर्षीय ट्रम्प यांनी १९९५ किंवा १९९६ मध्ये मॅनहॅटनमधील बर्गडॉर्फ गुडमन डिपार्टमेंटल स्टोअरमधील ड्रेसिंग रूममध्ये आपल्यावर बलात्कार केला. त्यानंतर ऑक्टोबर २०२२ मध्ये ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहून आपली मानहानी केली. शिवाय तिचे सर्व दावे फसवे आणि खोटे असल्याचे त्यांनी म्हटले. कॅरोल यांनी २०१९ मध्ये एका पुस्तकात पहिल्यांदाच या घटनेचा उल्लेख केला होता.