(मुंबई)
‘सीआयडी’ आणि ‘सावधान इंडिया’ यांसारख्या मालिकेत काम केलेली अभिनेत्री चंद्रिका सहाने पतीविरोधात आपल्या 15 महिन्यांच्या बाळाला जमिनीवर आदळून जखमी केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. त्यानंतर अभिनेत्रीने तिच्या पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज सोपवण्यात आलं आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट पहायला मिळत आहे की एक व्यक्ती लहान मुलाला बेडरुममध्ये जमिनीवर आदळत आहे.
अभिनेत्री चंद्रिका साहा (४१ वर्षे)ने तिचा नवरा २१ वर्षीय अमन मिश्राविरोधात तिने तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्रीने दिलेल्या तक्रारीत असं म्हटलं आहे की, शुक्रवारी ती स्वयंपाकघरात होती. तेव्हा तिने बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला. तिने अमनला मुलाकडे लक्ष देण्यास सांगितले. तेव्हा तिने पाहिले की अमन त्याला बेडरुममध्ये घेऊन गेला. अभिनेत्रीने पुन्हा काहीच मिनिटांमध्ये तिच्या बाळाचा रडण्याचा आवाज ऐकला आणि धम्म असा आवाजही तिला ऐकू आला. ती धावतच खोलीमध्ये पोहोचली, तेव्हा तिचं बाळ जखमी अवस्थेत पडलं होतं. तिने तातडीने बाळाला रुग्णालयात नेलं आणि त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा तपासला. तेव्हा धक्कादायक चित्रण समोर आले.
चंद्रिका साहा मालाडची रहिवासी आहे. आपला पती मुलामुळे आनंदी नव्हता असं तिने सांगितलं आहे. चंद्रिकाचा घटस्फोट झालेला असून 2020 मध्ये तिची अमनशी भेट जाली होती. यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. यावेळी अमनला चंद्रिका गर्भवती असल्याचं समजलं होतं. यानंतर त्याने चंद्रिकाला गर्भपात करण्याचा आग्रह केला होता. पण डॉक्टरांनी मूल पाडू नका असा सल्ला दिल्याने त्यांनी बाळाला जन्म दिला. मात्र मुलावरुन त्यांच्यात वारंवार भांडण होत होतं. याचदरम्यान मुलगा 14 महिन्यांचा असता दोघांनी लग्नगाठ बांधली.
पोलिसांनी चंद्रिका साहा यांनी गुन्हा दाखल केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आम्ही याप्रकरणी तपास करत असून, सीसीटीव्हीदेखील तपासत आहोत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.