(मुंबई)
भाजपचे आमदार गणेश नाईक यांना बलात्काराच्या आरोपातून मोठा दिलासा मिळाला आहे. गणेश नाईक यांच्या विरोधात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेनं बलात्काराचे आरोप केले होते, मात्र या महिलेने आपली तक्रार आता मागे घेतली आहे. संबंधित महिलेने आमदार गणेश नाईक यांच्याविरुद्ध दाखल केलेली बलात्काराची तक्रार मागे घेणारे पत्र नेरूळ पोलीस ठाण्यात दिले आहे. त्यात महिलेने खळबळजनक दावा केला आहे. नाईकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी शिवसेनेने मोठी ऑफर दिल्याचा आरोप महिलेने केला असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात महिलेने भाजप आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार केली होती.
तक्रारदार महिला आमदार गणेश नाईक यांच्याबरोबर गेल्या २७ वर्षापासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये रहात आहे. दोघांच्या प्रेमसंबंधातून तिला १५ वर्षाचा मुलगा झाला असून त्याला गणेश नाईक यांनी वडिलांचे नाव द्यावे, अशी मागणी महिलेने केली होती. याला नाईक यांनी नकार दिल्यानंतर तिने पोलीस ठाण्यात धाव घेत गणेश नाईकांवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, आता एका वर्षापूर्वी दाखल केलेले सर्व आरोप तक्रारदार महिलेने मागे घेतले आहेत. याबाबतचे पत्र महिलेने नेरूळ पोलीस ठाण्यात दिले.
पोलीस ठाण्यात सोपवलेल्या पत्रात महिलेने खळबळजनक दावा केला आहे. आमदार गणेश नाईक यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी आपल्यालाआमदार मंदा म्हात्रे आणि शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी प्रवृत्त केल्याचे पत्रात म्हटलं आहे. यासाठी शिवसेनेकडून उमेदवारी तसेच पैशांची ऑफर दिली होती, असे पत्रात म्हटले आहे. आता आपली गणेश नाईक यांच्याबाबत कुठलीही तक्रार नाही. मी दिलेली तक्रार मागे घेत आहे, असे महिलेने लेखी दिले आहे. यामुळे भाजप आमदार गणेश नाईक यांना दिलासा मिळाला आहे.
तक्रारदार महिला आणि गणेश नाईक हे दोघेही वर्ष १९९५ ते २०१७ पर्यंत लिव्ह इन रिलेशनमध्ये होते. त्यामुळे याला बलात्कार म्हणता येणार नाही, असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने गणेश नाईक यांना अटकपूर्व जामीन दिला होता. या प्रकरणात नाईक यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला होता.