(नवी दिल्ली)
भारतीय महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभुषण सिंह यांच्याविरोधात जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला आज शेतकरी संघटना आणि खाप पंचायतीचे बळ मिळाले. रविवार दि. ७ मे रोजी शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यासह हरियाणा आणि पंजाबमधील अनेक नेत्यांनी खेळाडूंची भेट घेतली. दरम्यान, शेतक-यांनी केंद्र सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. ब्रिजभुषण सिंह यांना १५ दिवसांत अटक न झाल्यास मोठा निर्णय घेतला जाईल असेही टिकैत म्हणाले.
रविवारी सायंकाळी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, कुस्तीगीरांनी न्यायासाठी संघर्ष सुरू ठेवावा. ब्रिजभुषण सिंह याला अटक व्हावी अशी युनायटेड किसान मोर्चा आणि खापची मागणी आहे. २१ मेपर्यंत ब्रिजभुषणला अटक न केल्यास मोठा निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले.
२१ मे रोजी पुढील रणनीतीसाठी रोडमॅप तयार केला जाईल. खेळाडूंचा अपमान आम्ही सहन करणार नाही. हे कुस्तीगीर देशाची संपत्ती आहेत. साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट २१ मेपर्यंत जंतरमंतरवर राहतील. येथेच राहतील, येथेच प्रॅक्टिस करतील आणि आंदोलन सुरू ठेवतील’’, असंही राकेश टिकैत म्हणाले.