(रत्नागिरी)
अंजुमन इस्लाम संस्था आणि नवनिर्माण शिक्षण संस्था एकाच ध्येयाने प्रेरित होऊन समाजातील वंचित,उपेक्षित आणि दुर्बळ घटकाला शिक्षणाच्या प्रवाहात आणत आहे. नवनिर्माण शिक्षण संस्था निस्वार्थ हेतूने रत्नागिरीमध्ये काम करत आहे. ज्याप्रमाणे जगातील सर्वोच्च असलेल्या बोस्टन येथील एमआयटी संस्था अंजुमन इस्लाम संस्थेसोबत काम करत आहे त्याप्रमाणे नवनिर्माणच्या शैक्षणिक चळवळी सोबत अंजुमन इस्लाम संस्था एमओयु करून काम करेल असे आश्वासन अंजुमन इस्लाम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त डॉ.जहीर काझी यांनी दिले आहे. ते एस.एम.जोशी विद्यानिकेतन मध्ये नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षारंभ सोहळा व एसपी हेगशेट्ये महाविद्यालयातील हॉटेल मॅनेजमेंटच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सिने निर्माते राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष नितीन वैद्य, सेलिब्रिटी शेफ निलेश लिमये, संस्थेचे अध्यक्ष अशोक बेलसरे, उपाध्यक्ष डॉ. अलिमियों परकार, चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, कार्यवाह परेश पाडगावकर, संचालिका सीमा हेगशेट्ये, ऋतुजा हेगशेट्ये, माजी प्राचार्य डॉ. सुरेश जोशी, राष्ट्रवादीचे नेते बशीर मूर्तुझा, आत्माराम मेस्त्री, प्राचार्य आशा जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन न करता संविधानाची मूल्य, तत्व दर्शविणाऱ्या पट्ट्या झाडामध्ये अडकवुन करण्यात आले व संविधानाची मूल्य जपण्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी डॉ. जहीर काझी म्हणाले की, नवनिर्माणची भौतिक सुविधा पाहून मी प्रभावित झालो. रत्नागिरी सारख्या भागात इतक्या उच्य दर्जाची भौतिक सुविधा असू शकते यावर विश्वास बसत नाही. नवनिर्माण शिक्षण संस्थेचे व्यवस्थापन निस्वार्थ हेतूने काम करीत आहेत. ते राष्ट्रसेवा दलाच्या उद्दिष्ट प्रमाणे काम करत आहेत हे खरंच वाखाण्याजोगे आहे. ही संस्था प्रायव्हेट असूनही कमर्शियल न होता चॅरिटेबल तत्त्वावर काम करत आहे हे कौतुकास्पद आहे. संस्थेतील महाविद्यालयामध्ये अखंड भारताचे दर्शन होते. गडचिरोलीपासून विद्यार्थी येथे प्रवेशासाठी येतात. अगदी शेवटच्या घटकापर्यंत नवनिर्माण पोहोचत आहे.अशा प्रकारच्या संस्था देशात काम करत असल्याने दर्जेदार शिक्षणाने त्या भारताला विश्वगुरू बनवण्यास मदत करत आहेत.
यावेळी प्रमुख अतिथी, सेने निर्माते आणि राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष नितीन वैद्य यांनी आपल्या मनोगतांमध्ये अभिजीत हेगशेट्ये यांच्या कार्याचा आढावा मांडताना त्यांच्या प्रवासाचा मी एक साक्षीदार असताना त्यांचा संघर्ष जवळून पाहिला असल्याचे सांगितले. त्यांनी अनेक खस्ता खाल्या. स्वप्न पाहताना लोकांना जोडत ते सत्यात कसे उतरवायचे हे अभिजीतने सिद्ध करून दाखवले आहे.राष्ट्रसेवा दलाचे संस्कार त्याने जपले आहेत. राष्ट्रसेवा दलाचा वारसा खऱ्या अर्थाने ते जपत आहेत. मातृ मंदिरच्या माध्यमातून त्यांचे सुपर स्पेशलिटी स्वप्न पूर्ण व्हावे अशा शुभेच्छा त्यानी यावेळी दिल्या.
या कार्यक्रमात डॉ. अलीमिया परकार यांनी प्रवाह विरुद्ध लढून अभिजीत हेगशेट्ये यांनी शिक्षण क्षेत्रातील साम्राज्य उभे केले आहे असे सांगताना त्यांच्या कर्तुत्वाला त्यांनी सलाम केला. डॉ. सुरेश जोशी यांनी अनवाणी पायांना नवनिर्माणच्या माध्यमातून बळ दिले. कुणाचेही फॉलोवर न होता त्यांनी नवनिर्मिती केली.हा वारसा सांभाळायचा वाढवायचा आणि वाटायचा याची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे असे सांगितले. या कार्यक्रमात अभिजीत हेगशेट्ये यांनी प्रस्तावित केले. ऋतुजा हेगशेट्ये यांनी इंग्रजी मधून संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. आत्माराम मेस्त्री, सेलिब्रिटी शेफ निलेश लिमये यांनी मनोगत व्यक्त केले.संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन टेकाळे यांनी तर आभार प्रदर्शनप्राचार्य डॉ.आशा जगदाळे यांनी मानले.