(चिपळूण / इकलाक खान)
गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील नंदकुमार बाबाजी तांडेल याला खून व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी येथील जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरविले असून त्याला जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तांडेल याला जन्मठेपेची शिक्षा मिळावी यासाठी सरकारी वकील प्रफुल्ल साळवी यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यांचा युक्तिवाद ग्राहय मानत सबळ पुराव्यानिशी अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन.एस. मोमीन यांनी आज शनिवारी ही शिक्षा सुनावली.
वेळणेश्वर खारवीवाडी येथे २०१८ मध्ये हा गुन्हा घडला होता. संशयित आरोपी नंदकुमार बाबाजी तांबे याची पत्नी अंजनी आणि दिवाकर हरी तांडेल यांची पत्नी देवयानी तांडेल यांच्यात शाब्दिक बचावाची झाली होती. त्याचे रूपांतर भांडणात झाले. शिवीगाळ आणि एकमेकांना जीवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली होती. हा वाद मिटवण्यासाठी खारवी समाजाची बैठक ही बोलवण्यात आली होती. मात्र बैठकीनंतरही नंदकुमार तांडेल याने दिवाकर तांडेल यांच्यावर डुक ठेवला होता.
28 जुलै 2018 रोजी दिवाकर तांडे याचे प्रफुल्ल आणि प्रफुल्ली अशी दोन मुले सकाळी सात वाजता शाळेत गेले. दिवाकर तांडेल हे दुपारी बारा वाजता घरच्या खोलीत जेवण करत होते. त्यावेळी नंदकुमार बाबाजी तांडेल हा दिवाकर तांडेल यांच्या घरात काठी घेऊन घुसला आणि दिवाकर तांडेल यांच्या डोक्यावर मरेपर्यंत अकरा फटके मारले. दिवाकर तांडेल यांचा जीव गेल्यानंतरही नंदकुमार तांडेल त्याला काठीने मारत होता.
त्यावेळी दिवाकर तांडेल याची पत्नी आडवी पडली तिने माझ्या नवऱ्याला मारू नका, अशी दया-वया केली. परंतु नंदकुमार तांडेल याने मद्यपान केले होते. त्या नशेत त्याने दिवाकर तांडेल यांच्या पत्नीलाही दुखापत केली. नंदकुमार तांडेल याला तिची पत्नी अंजनी हिने दिवाकर तांडेल यांच्या घरातून ओढत बाहेर काढले. तेव्हा हा प्रकार शेजारच्या लोकांना समजला. तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांपैकी काहींनी देवयानी तांडेल यांना अधिक उपचारासाठी गुहागर येथे आणले. उपचार घेतल्यानंतर देवयानी तांडेल हिने नंदकुमार तांडेल यांच्या विरोधात गुहागर पोलीस स्थानकात तक्रार दिली होती.
गुहागरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी या गुन्ह्याचा तपास करून नंदकुमार तांडेल याला अटक केली होती. त्यानंतर तपास पूर्ण करत न्यायालयात दोषारोप दाखल केले होते. सरकारी वकील प्रफुल्ल साळवी यांनी दिवाकर तांडेल यांच्यावतीने आरोपी नंदकुमार तांडेल याला शिक्षा होण्यासाठी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला.यावेळी सबळ असे पुरावे त्यांनी न्यायालयासमोर ठेवले होते.तसेच प्रत्यक्ष साक्षीदार यांचे जाबजबाबसह अनेक मुद्दे त्यांनी यावेळी उपस्थित करून आरोपी दोषी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.त्यामुळे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मोमीन यांनी नंदकुमार तांडेल यांना तीन वेगवेगळ्या गुन्हे अंतर्गत आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच अठरा हजार रुपयांचे दंडही थोटावले आहे. दंड न भरल्यास अकरा महिन्याची सश्रम कारावासी शिक्षा सुनावली आहे.
अखेर आम्हाला न्याय मिळाला
आमचे कुटूंब मोलमजुरी करून पोट भरणारे आहे. माझे पती दिवाकर तांडेल हे मासेमारी करणाऱ्या बोटीवर खलाशी म्हणून काम करायचे. त्यांच्या निधनानंतर कुटूंबाच्या उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला. आमचा मुलगा प्रफुल्ल याने सहावीत असताना अर्धवट शिक्षण सोडले आणि तो मासीमारी करणाऱ्या बोटीवर मजुरीसाठी जाऊ लागला. कर्ता पुरूष गेल्यानंतर आमचे खूप हाल झाले. पण न्यायालयाने आज जो निकाल दिला त्याने आम्ही समाधानी असून आम्हाला न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया श्रीम. देवयानी तांडेल यांनी यावेळी दिली.