(खेड)
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील अरोमा इंटरमिडिएट कंपनीत रिॲक्टर मधील ॲसीडने आज अचानक पेट घेतल्याने अपघात घडला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.
आज शुक्रवार सकाळी प्लॉट नंबर डी.१४ मध्ये असलेल्या आरोमा इंटरमिडीएट या कंपनीत पाणी नसल्याने रिॲक्टर थंड ठेवण्याची व्यवस्था नव्हती. तर उन्हाळा असल्याने वेगाने होणाऱ्या तापमान वाढीमुळे रिॲक्टर मधील रसायनाने अचानक पेट घेतला. आगीचा भडका उडाल्याने घटनास्थळी पोहोचलेल्या ग्रामस्थ व जवळच्या कारखान्यातील कामगारांनी तातडीने लोटे औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दल व खेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली.