( पाचल / तुषार पाचलकर )
कित्येक महिन्यापासून पाचल परिसरातील ताम्हाणे, तळवडे, करक, करवली या गावांमध्ये ग्रामस्थांना बिबट्याचा वावर जाणवत आला आहे, परंतु कोणतीही जीवीत हानी झाली नव्हती. परंतु काही दिवसापूर्वी पाचल चे पांडुरंग झोरे या शेतकऱ्याची गाय व धुलाजी कोकरे यांचा बकरा बिबट्याने ठार मारल्याने पाचल परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नुकतेच पाचल चे ग्रामस्थ सिद्धेश गांगण यांच्या पाळीव कुत्र्यावर रात्री दहाच्या सुमारास घराच्या परिसरातून ओढून नेऊन त्यावर प्राण घातक हल्ला केल्याने सदर कुत्रा गंभीरित्या जखमी झाला. सुदैवाने श्रीमती अस्मिता गांगन यांच्या धाडसामुळे बिबट्याच्या तावडीतून कुत्र्याची सुखरूप सोडवणूक केल्याने कुत्र्याचे प्राण वाचले. या त्यांच्या धाडसाचं वनविभाग अधिकारी श्री घाडगे यांसह ग्रामस्थ त्यांचे कौतुक करीत आहेत. या आधी देखील त्यांच्या घरातील पाळीव प्राण्यावर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार मारलं होतं.
असे प्रकार वारंवार होऊ लागल्यामुळे, व पाचल गावच्या लोकवस्तीत बिबट्याचा वावर वाढल्यामुळे पाचल मधील लोकवस्तीची जिथे बिबट्याचा वावर जास्त प्रमाणात असतो, अश्या ठिकाणी वनविभाग अधिकारी श्री सदानंद घाडगे यांसह ग्रामपंचायत सदस्य श्री विनायक सक्रे ग्रामस्थ तुषार पाचलकर यांनी नुकतीच पाहणी केली व याबाबत वरिष्ठांशी बोलून लवकरच योग्य ती उपाययोजना करण्याचं आश्वासन वनविभाग अधिकारी श्री सदानंद घाडगे यांनी दिलं आहे.