शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या भक्तांसाठी मोठी बातमी आहे. शेगावमधील आनंद सागर प्रकल्पातील बंद असलेले अध्यात्मिक केंद्र आजपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेगावतील मंदिराप्रमाणेच आनंद सागर येथे नेहमीच भाविकांसह पर्यटकांची गर्दी दिसून येत असे. यामुळे येथे पर्यटन वाढलं होतं. मात्र मध्यंतरी काही कारणामुळे शेगाव संस्थांनी आनंद सागर प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आज सकाळी दहा वाजेपासून आनंद सागर मधील अध्यात्मिक केंद्र भाविकांकरता खुले होणार आहे.
आध्यात्मिक केंद्राचा काही भाग कोविड काळानंतर आहे त्या स्थितीमध्ये सुरु करण्यात आलेला आहे. प्रवेश सेवार्थ (निःशुल्क) राहील. वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अशी आहे. सायंकाळी ४ वाजता प्रवेश बंद करण्यात येईल. शासन निर्देशानुसार कोविड काळामध्ये काही अपवाद वगळता गेली दोन वर्षे श्रींचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद होते. या बंद काळामध्ये निधी अभावी श्री संस्थेचे सर्व सेवाभावी उपक्रम व नियोजीत अत्यावश्यक विकास कामे थांबविण्यात आली होती.
श्री संस्थेच्या विश्वस्त मंडळाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार सर्व सेवाकार्याचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आलेला आहे. परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर, आर्थिक घडी निट बसल्यावर तसेच आवश्यक सेवाधाऱ्यांची सेवा व मुबलक पाणी उपलब्ध झाल्यावर आध्यात्मिक केंद्राची देखभाल-दुरुस्ती, काही भागाचे पुनर्निर्माण व पुढील विकास कार्ये हाती घेण्यात येतील. मात्र यास बराच कालावधी लागणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.