(मुंबई)
शरद पवारांच्या राजीनाम्यामुळे राज्यात खळबळ माजली असताना याचा परिणाम महाविकास आघाडीवरही झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या पुण्यात होणाऱ्या सभेसह पुढील सर्व वज्रमूठ सभा रद्द होणारअसल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून समजते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींचा परिणाम म्हणून आगामी सर्व वज्रमूठ सभा रद्द होत आहेत. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुनशरद पवार निवृत्त झाल्यानंतर आता त्याचा परिणाम राज्यातील महाविकास आघाडीवरही होत असल्याचं दिसून येतंय.
पुण्यासह कोल्हापूर, नाशिक आणि अमरावती येथे नियोजित केलल्या वज्रमूठ सभा रद्द झाल्यात जमा असल्याचं बोललं जातंय. पुण्यात 14 मे रोजी, कोल्हापुरात 28 मे रोजी, नाशिकला 3 जूनला तसेच 11 जूनला अमरावतीत नियोजित केलेल्या वज्रमूठ सभा रद्द झाल्याचं बोलल जातंय. दरम्यान, शरद पवारांनी राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडल्याच्या पार्श्वभूमीवर मविआच्या सभाच रद्द होणं याचा काही राजकीय विश्लेषक वेगळा अर्थ काढत आहेत.
पुण्याला होणाऱ्या सभेच्या आयोजनाची जबाबदारी अजित पवारांवर आहे. मात्र राष्ट्रवादीमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुढील सर्व वज्रमूठ सभा रद्द होत असल्याची सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादीची पुढची रणनिती काय असणार, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, प्रफुल पटेल यांनी मात्र शरद पवारांच्या राजीनाम्याचा आणि वज्रमूठ सभा रद्द होण्याचा काही संबध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. कडक उन्हामुळे वज्रमूठ सभा पुढे ढकलण्याची चर्चा मुंबईतील सभेवेळीच करण्यात आली होती. शरद पवारांच्या राजीनाम्याचा वज्रमूठ सभेवर काही परिणाम झालेला नाही. सध्या आम्ही वज्रमूठ सभा आणि महाविकास आघाडीबाबत चर्चा करत नसून राष्ट्रवादीच्या अंतर्गत बाबींवर चर्चा केली जात आहे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. तर राष्ट्रवादीचे अध्यक्षपद हे त्यांचा पक्षांतर्गत निर्णय आहे, महाविकास आघाडीवर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय.
राष्ट्रवादीच्या सर्व घडामोडींकडे ठाकरे गट वेट अँड वॅाचच्या भूमिकेत आहे. लोकसभा निवडणुका जवळ आल्या असताना पवारांनी घेतलेल्या या निर्णयामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसही अस्वस्थ असल्याचं बोललं जातंय. भाजपची केंद्रातील उचलबांगडी करायची असेल तर विरोधकांनी एकत्रित भाजपच्या आव्हानाचा सामना करावा लागेल असं वारंवार मविआकडून बोललं गेलं. पण आता पवारच निवृत होत असल्याने विरोधकांची ही एकी 2024 मध्ये दिसेल का यावरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.