(मोहाली)
मुंबई इंडियन्सने इशान किशन आणि सूर्यकुमार यादवच्या दमदार ११६ धावांच्या भागीदारीच्या जोरावर पंजाब किंग्जचे २१५ धावांचे आव्हान १८.५ षटकात ४ फलंदाजांच्या मोबदल्यात पर करत सामना ६ विकेट्सनी खिशात टाकला. मुंंबईकडून इशान किशनने ७५ धावांची तर सूर्यकुमार यादवने ६६ धावांची खेळी केली. तिलक वर्माने १० चेंडूत २९ धावा चोपून सामना षटकाराने संपवले. या विजयाबरोबरच मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत १० गुणांसह सहावे स्थान पटकावले.
मोहालीत झालेल्या थरारक सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा पराभव केला आहे. इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि टीम डेव्हिड यांच्या वादळी खेळीमुळे मुंबईने २१५ धावांचं लक्ष्य १८.५ षटकांत पार केलं. पंजाबकडून शिखर धवन, मँथ्यू शॉर्ट यांनी धमाकेदार सुरुवात करून दिली होती. त्यानंतर जितेश शर्मा ४९ (२७) आणि लियाम लिविंगस्टोन ८२ (४२) यांनी वादळी खेळी करत संघाला दोनशेपार धावांचा आकडा पार करून दिला. त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या मुंबईचा कर्णधार आणि सलामीवीर शून्यावर बाद झाला. इशान किशन ७५ (४१) आणि कॅमरन ग्रीन २३ (१८) यांनी पॉवरप्लेमध्ये संघाला चांगली सुरुवात करून दिली. कॅमरन ग्रीन बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव ३१ (६६) आणि इशान किशनने पंजाबच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत वादळी अर्धशतकी खेळी केली. सूर्या-किशनने शतकी भागीदारी रचली. ही भागीदारी ११६ धावांपर्यंत नेत या दोघांनी मुंबईला १५ षटकात १७० धावांपर्यत पोहचवले. त्यानंतर डेव्हीड आणि तिलक या जोडीने जोरदार फटकेबाजी करीत १९ व्या षटकातच विजयश्री खेचून आणली.
पंजाबकडून सॅम करनने दोन तर ऋषी धवन आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. मुंबई इंडियन्सकडून फिरकीपटू कुमार कार्तिकेयने दोन आणि अर्शद खानने एक विकेट घेतली.