( रत्नागिरी )
मुंबई – गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील खवटी गावाच्या हद्दीतील हॉटेल सृष्टी समोर राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी गोवा बनावटीचा मोठा मद्यसाठा जप्त केला. मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत गाडीसहित ४३ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त व संचालक यांच्या आदेशान्वये तसेच विभागीय उपआयुक्त कोल्हापुर विभाग व रत्नागिरी जिल्हयाचे जिल्हा अधीक्षक सागर धोमकर व प्रभारी अधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर अवैद्य मद्याची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडुन ठिकठिकाणी तपासणीनाके गस्ती मोहिम राबविण्यात येत आहे.
या दरम्यान निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क खेड विभागामार्फत राष्ट्रीय महामार्गावर अचानक वाहन तपासणी व गस्त घालत असताना खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर मौजे खवटी गावच्या हददीत राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर हॉटेल सृष्टी धाबा समोर सापळा लावण्यात आला. मंगळवारी संध्याकाळी १६.१५ वा. चे सुमारास गोवाहुन मुंबईच्या दिशेने येणा-या वाहनांची कसून तपासणी सुरू होती. यावेळी एक संशयित पांढरया रंगाचा टाटा (एमएच-04-जी एफ) गाडी तपासणीसाठी थांबवण्यात आली. यावेळी वाहन तपासणी केली असता चालकाच्या मागील बाजुस हौदयामध्ये मद्यसाठा आढळून आला.
यामध्ये ७५० मी.लि. मापाचे एमपीरीयल ब्लु विदेशी मद्यचे एकुण ५० बॉक्स, ७५० मी.लि. मापाचे रॉयल चॅलेंज विदेशी मद्यचे एकुण १०० बॉक्स तसेच ७५० मी.लि. मापाचे ऑल सीझन विदेशी मद्यचे एकुण ५० बॉक्स, १८० मी. लि. मापाचे एमपीरीयल ब्लु विदेशी मद्यचे एकुण २५० बॉक्स व १८० मी.लि. मापाचे रॉयल चॅलेंज विदेशी मद्यचे एकुण ५० बॉक्स असे एकुण ५०० बॉक्स मिळुन आले. एकुण ४३९२ ब. लि. विदेशी मद्याचा साठा मीळुन आला. असे एकुण गाडी सहीत मुद्देमालाची किंमत रू.४७,७३,००० एवढया किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर मुद्देमाल वाहतुक करणारा ट्रक चालक प्रेमकुमार जेठाराम थोरी (रा. जेठाराम थोरी लालेकी बेरी बाँड, बारनेर राजस्थान) याला चौकशीसाठी ताब्यात घेवुन त्याचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क खेड विभागाचे निरीक्षक श्री. सुनिल आरडेकर, दुय्यम निरीक्षक श्री. महादेव आगळे, तसेच जवान अनुराग बर्वे, वाहन चालक अतुल वसावे तसेच भरारी पथक साताराचे अमोल खरात यांनी भाग घेतला. तसेच श्री. गणपत जाधव व श्री. विजय सावंत यांनी सदर कारवाईकामी मदत केली. वरील गुन्हयांचा पुढिल तपास निरीक्षक श्री. सुनिल आरडेकर करीत आहेत.