( खेड / इक्बाल जमादार )
ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचालित ज्ञानदीप महाविद्यालय मोरवंडे- बोरज येथे वार्षिक पदवीदान समारंभ रविवार दि. ३० एप्रिल रोजी पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे सरचिटणीस मा. श्री. प्रकाश गुजराथी हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी हे होते.
संस्थेचे अध्यक्ष मा. श्री अरविंद तोडकरी यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन मा. श्री. दीपक लढ्ढा यांच्या हस्ते अध्यक्षांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये विज्ञान व वाणिज्य विभागात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवीचे वाटप करण्यात आले.
ज्ञानदीप परिवार यावर्षी रौप्यमहोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करत असून ज्ञानदीप मध्ये सध्या सुरु असलेल्या फार्मसी, आर्कीटेक्चर तसेच हॉटेल मॅनेजमेन्ट प्रमाणे विधी महाविद्यालयही प्रस्तावित आहे. भविष्यात ज्ञानदीप हे या सगळ्या महाविद्यालयांना जोडणारे एक अभिमत विद्यापीठ म्हणून समोर येत असून कोकणातील विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी सर्व कोर्सेस उपलब्ध करून देणारे व्यासपीठ ज्ञानदीप परिवार निर्माण करत आहे याचा प्रत्येकाला अभिमान वाटेल असा विश्वास कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व संस्थेचे सरचिटणीस मा. श्री. प्रकाश गुजराथी यांनी व्यक्त केला. कोकणातून सनदी अधिकारी निर्माण व्हावेत व कोकणातील शैक्षणिक, सामाजिक विकासासाठी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे असे आवाहन करून विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी मा. श्री भालचंद्र कांबळे, प्रा. डॉ. उमेशकुमार बागल, ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कुल चे मुख्याध्यापक श्री. भरत मोरे सर, श्री. सीतारामपंत जामकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजोग जाधव यांनी तर आभार प्रा. चंद्रसेन घुंबरे यांनी मानले.
संस्थेचे अध्यक्ष श्री. अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष श्री. माधव पेठे, संस्थेचे सरचिटणीस श्री. प्रकाश गुजराथी, महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन श्री. दीपक लढ्ढा, संस्थेचे सर्व सभासद व प्राथमिक व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. भरत मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय अनंत कुलकर्णी यांचेकडून या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.