(मुंबई)
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे देशभरात करोडो लाभार्थी आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी ही एक योजना आहे. या योजनेअंतर्गत, सरकार अल्पभूधारक आणि गरीब शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक ६,००० रुपयांची आर्थिक मदत हस्तांतरित करते. या योजनेअंतर्गत प्रत्येक खातेदाराच्या खात्यात २,००० रुपये तीन हप्त्यात हस्तांतरित केले जातात.
किसान सन्मान निधीअंतर्गत राज्यातील सुमारे १ कोटी १० लाख ५९ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. या योजनेच्या निकषानुसार आयकर भरणारी व्यक्ती, आमदार, खासदार, वकील डॉक्टर आदी या योजनेसाठी पात्र ठरत नाहीत. मात्र अशा अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसै जमा झालेले आहेत. ही रक्कम थोडीथोडकी नसून १५५४ कोटी रुपये इतकी आहे. त्यातील केवळ ९२.७४ कोटी रुपये पुन्हा वसूल करण्यात सरकारच्या कृषी विभागाला यश आले आहे. कर भरणाऱ्यांकडून ७७ लाख रुपये तर अन्य अपात्र शेतकऱ्यांकडून १५.६७ लाख रुपयांची वसुली आतापर्यंत करण्यात आली आहे.
त्यामुळे अपात्र लाभार्थींच्या खात्यावर आजवर जमा झालेल्या सर्व हप्त्यांच्या अनुदानाची रक्कम वसूल केली जात आहे. तहसील कार्यालयाकडून नोटीस प्राप्त झाल्यानंतर अनेक आयकर दाता शेतकऱ्यांनी तत्काळ अनुदानाची रक्कम परत केली. या योजनेच्या लाभासाठी आयकर दाता शेतकरी अपात्र आहेत. ही योजना सुरू झाली त्या वेळी अनेक जमीन नसलेल्या व्यक्तींनी नोंदणी केली आहे.
सरकारने शेतकऱ्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. जर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अर्ज केला असेल तर त्याची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही १५५२६१ वर कॉल करू शकता. यावर तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळू शकते.