[ संगमेश्वर ]
तालुक्यातील उमरे या छोट्याशा गावातील पिण्याच्या पाण्याची विहीर दूषित झाली आहे. या वस्तीत पावणेदोनशे नागरिकांना ही विहिर पाणी पुरवित असते. उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. जिल्ह्यातील काही भागांमधून पाण्याची टंचाई जाणवत आहे. मात्र उमरे गावात विहिरीत पाणी असून देखील ते पाणी पिण्यायोग्य नाही. या विहिरीतील पाण्यावर हिरव्या रंगाचा थर साचलेला पाहायला मिळतो. या अशुद्ध पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती परिसरातील नागरिक व्यक्त करत आहे.
काही वर्षांपूर्वी पाणी टंचाईच्या काळात उमरे बौद्धवाडीतील बहुतांश लोकांना अशुद्ध पाण्यामुळे विषबाधा झाली होती. याचीच पुनरावृत्ती या वर्षीही होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. उमरे बाईतवाडी जवळ असणाऱ्या विहिरीतील अशुद्ध पाणी प्यायल्याने याठिकाणी कामासाठी आलेल्या सावंत कुटुंबियांना याची लागण होऊन उलटी, जुलाब यांचा संसर्ग झाला आहे. सोबत आणखी कामगारांना याचा त्रास होताच सदर लोकांना संगमेश्वर व रत्नागिरी शासकीय रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सध्या सर्वांची तब्बेत व्यवस्थित आहे. या विहिरीमधील पाण्याच्या शुद्धीकरणासंदर्भात ग्रामपंचायतकडे तेथील नागरिकांनी वेळोवेळी तोंडी सांगितल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले आहे. मात्र तरीही याकडे ग्रामपंचायत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आम्ही पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवत असतो. मात्र पाण्याचे नमुने योग्य येत आहे. सदर विहिरीचे पाणी अनेक दिवसांपासून नागरिक पित आहेत. मात्र हा अचानक घडलेला प्रकार असल्याने ग्रामपंचायतीचे कर्मचारी विहिरीची पाहणी करनार आहे. तसेच नागरीकांना ही पाणी पिऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. कोणताही विलंब न करता विहिरीच्या पाण्याचा उपसा करून पाण्याचे शुध्दीकरण केले जाईल.
– उमरे ग्रामसेवक धावले