(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरालगतच्या नाचणे शांतीनगर येथे बस मधून उतरून चालत जाणार्या 13 वर्षीय मुलाला दुचाकीस्वाराने पाठीमागून धडक दिल्याने जखमी झाल्याची घटना 18 एप्रिल रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत दत्तात्रय लिंगायत (29, कसबा, हरचेरी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्थक सचिन मजगावकर (13, नाचणे, शांतीनगर, रत्नागिरी) हा बसमधून उतरुन आपल्या घराकडे जात होता. यावेळी आपल्या ताब्यातील दुचाकीवरुन आलेल्या संकेत लिंगायत याने पाठीमागील बाजूने सार्थक याला धडक दिली. या धडकेत सार्थक याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हयगयीने दुचाकी चालवून मुलाच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संकेत लिंगायत याच्यावर भादविकलम 279, 337, 338 मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.