(रत्नागिरी)
बुरबांड (ता. संगमेश्वर) येथील ११ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या तरुणाला न्यायालयाने ३ वर्षे सक्तमजुरी व ६ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. राकेश रमेश चव्हाण (३६, रा. कळंबुशी ता. संगमेश्वर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध संगमेश्वर पोलिसांकडून गुन्हा दाखल केला होता.
रत्नागिरी अतिरिक्त सत्र व विशेष पॉक्सो न्यायाधीश वैजयंतीमाला आबासाहेब राऊत यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकार पक्षाकडून अॅड. मेघना नलावडे यांना काम पाहिले व युक्तीवाद केला. खटल्यातील माहितीनुसार, २० सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १.३० वाजता पीडित तरुणी बटाटे आणण्यासाठी किराणा दुकानात निघाली होती. यावेळी संशयित आरोपीने दुचाकीवरुन येत पीडितेला हॉर्न देत पुढे निघून गेला होता. दरम्यान किराणा मालाचे दुकान बंद असल्याने पीड़ित मुलगी ही परत घराकडे चालत जात असताना आरोपीने पीडित मुलीचा पाठलाग केला. तसेच तू माझ्यासोबत दुचाकीवर बसून कोंडीवरेत चल, असे म्हणाला. मात्र पीडितेने त्यास नकार दिला असता पुन्हा आरोपी तिचा पाठलाग करू लागला.
यावेळी पीडितेने वाचवा वाचवा असा आरडाओरडा केला. यावेळी आरोपीने पीडित मुलीचे तोंड दाबून ओरडलीस तर तुला ठार मारेन, असे बोलून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच पळवून नेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राकेश चव्हाण याच्यावर ठेवण्यात आला होता.
पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरूद्ध भादंवि कलम ३६३, ३५४ (ड) (१),५११,५०६ तसेच बालकांच्या लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १२ व १८ नुसार गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास संगमेश्वर पोलीस ठाण्यातील तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. व्ही. देशमुख यांनी करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवले. खटल्यादरम्यान एकूण १६ साक्षीदार तपासण्यात आले. पैरवी म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल बापट यांनी काम पाहिले.