(बंगळुरू)
आरसीबीचे फलंदाज पुन्हा एकदा कोलकात्याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले. त्यामुळे केकेआरचा २१ धावांनी विजय झाला. २०१ धावांचा पाठलाग करताना आरसीबीने २० षटकांत ८ विकेटच्या मोबदल्यात १७९ धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहली याने अर्धशतकी खेळी केली, पण इतर फलंदाजांकडून साथ न मिळाल्यामुळे आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला. लीग सामन्यात कोलकात्याने तिसरा विजय मिळवला. या तीन विजयातील दोन विजय आरसीबीविरोधात मिळवले. फिल्डिंग आणि फलंदाजीमुळे सामना गमावल्याचे विराट कोहलीने सामन्यानंतर सांगितले. आरसीबीचे पाच फलंदाज फिरकी गोलंदाजांच्या चेंडूवर बाद झाले. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना झाला. या सामन्यात केकेआरच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी एकत्रितपणे चमकदार कामगिरी केली.
२०१ धावांचा पाठलाग करताना विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी दमदार सुरुवात केली होती. पहिल्या दोन षटकात ३० धावांचा पाऊस पाडला होता. पण तिस-या षटकात सुयश शर्माने फाफला बाद केले. त्यानंतर शाहबाज अहमदही फार काळ मैदानावर टिकू शकला नाही. शाहबाज अहमद दोन धावांवर बाद झाला. ग्लेन मॅक्सवेल याला पाच धावांवर वरुण चक्रवर्तीने बाद करत आरसीबीच्या अडचणी वाढवल्या.
विराट कोहली आणि महिपाल लोमरोर यांनी आरसीबीचा डाव सावरला. दोघांनी चौफेर फटकेबाजी करत विजयाकडे आगेकूच केली. चौथ्या विकेटसाठी दोघांनी ३४ चेंडूत ५५ धावांची भागीदारी केली. आरसीबीची ही सर्वात मोठी भागीदारी होती. त्याशिवाय इतर कोणताही मोठी भागीदारी झाली नाही. महिपाल लोमरोर याने १८ चेंडूत ३४ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तीन षटकार आणि एक चौकार लगावला. लोमरोर बाद झाल्यानंतर विराट कोहलीही लगेच तंबूत परतला. विराट कोहलीने सहा चौकारासह ५४ धावांची खेळी केली. विराट कोहली बाद झाल्यानंतर आरसीबीची फलंदाजी पुन्हा ढेपाळली. दिनेश कार्तिक याने २२ धावांचे योगदान दिले. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. सुयेश प्रभुदेसाई याने दहा धावांचे योगदान दिले. हसरंगा, विली आणि वैशाक यांनी आरसीबीचा मोठा पराभव टाळला.
कोलकाताने फलंदाजीनंतर गोलंदाजीतही चमकदार कामगिरी केली. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर सुयश शर्माला २ बळी मिळाले. मध्यमगती गोलंदाज आंद्रे रसेलनेही २ महत्त्वाचे बळी घेतले.