(मुंबई)
राज्यात सध्या तापमान चांगलेच वाढले आहे. या उन्हामुळे उष्माघात होत असून यामुळे नागरिक आजारी पडत आहे. खारघर येथे उष्माघातामुळे १४ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने देखील दुपारी कार्यक्रम घेण्याचे टाळावे असे आदेश दिले आहेत. दरम्यान, आता कर्तव्यदक्ष असणाऱ्या पोलिसांसाठी देखील एक महत्वाचा आदेश काढण्यात आला आहे.
भर उन्हात पोलिस आपली सेवा बजावत असतात. पोलिसांना या उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी एक खास आदेश काढण्यात आला आहे. आरोग्याची समस्या असलेले ५५ वर्षांवरील मुंबईतील वाहतूक हवालदार दुपारी १२ ते संध्याकाळी ५ पर्यंत रस्त्यावरुन ऑफ ड्युटी राहणार असे या आदेशात म्हटले आहे. मुंबई वाहतूक विभागाने हा आदेश जारी केला आहे.
उन्हाचा या कर्मचाऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी मुंबई पोलीस दलाने ५५ वर्षांहून जास्त वय असलेले तसेच आजारी किंवा व्याधी असलेल्या कर्मचाऱ्यांना दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत ड्युटी न लावण्याचा निर्णय घेतला आहे. या पोलिसांच्या जागी तरुण आणि सक्षम असणाऱ्यांना या वेळत ड्युटी दिली जाणार आहे. मुंबई वाहतूक विभागाकडून या बाबत आदेश जारी करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांना वर्षभर रस्त्यावर उभे राहून आणि उन्हामध्ये कर्तव्य बजवावे लागते. अधिकारी व अंमलदार यांना उष्माघात होऊ नये याकरता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
अशा आहेत सूचना
- वाहतूक विभागातील ज्या अंमलदारांचे वय ५५ वर्षांपेक्षा जास्त आहे आणि ज्यांना बीपी, शुगर, दमा, दुर्धर आजार, मोठे ऑपरेशन झाले आहे अशा अंमलदारांची दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत रस्त्यावर ड्युटी लावण्यात येऊ नये.
या काळात तरुण आणि सशक्त अंमलदारांची नेमणूक करण्यात यावी. - एका कर्मचाऱ्याची नेमणूक न करता जोडीने नेमणूक करावी. आवश्यक त्या ठिकाणी वॉर्डन नेमावे.
- अधिकारी आणि अंमलदार यांच्याकरता स्वच्छ आणि थंड पाण्याची व्यवस्था त्यांच्या कामाच्या वेळेत दुपारी करावी.
- वाढते तापमान बघता सर्व अधिकारी आणि अंमलदारांनी न चुकता डोक्यावर टोपी परिधान करावी.
- कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांन जर छातीत दुखणे, चक्कर येणे किंवा इतर कोणत्याही आरोग्यविषयक समस्या झाल्यास त्यांना तात्काळ कुटुंब आरोग्य योजना कार्यान्वित असलेल्या जवळच्या रुग्णालयात दाखल करावे.