( प्रतिनिधी / संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील निवे खुर्द माईनवाडी येथे श्री गांगोबा कबड्डी संघाच्यावतीने घेण्यात आलेल्या अजय स्मृती कबड्डी चषक स्पर्धेत मानसकोंड येथील आई अंत्राळदेवी संघाने आपले नाव कोरले आहे.
या स्पर्धेत 32 संघ सहभागी झाले होते. अंतिम सामना हा आई अंत्राळदेवी मानसकोंड व निनावी मारी या संघांमध्ये झाला. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यात मानसकोंड संघाने विजयी प्राप्त केला. तत्पुर्वी उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात मानसकोंड संघाने रामेश्वर साटलेवाडी संघावर तर दुसऱ्या सामन्यात निनावी मारी संघाने यारी दोस्ती माळवाशी संघावर विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. स्पर्धेत रामेश्वर साटलेवाडी तृतीय क्रमांकाचे तर यारी दोस्ती माळवाशी संघ चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. चारही संघांना रोख रक्कम व आकर्षक चषक देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
उत्कृष्ट चढाई पटू गोस्वामी (निनावी मारी), उत्कृष्ट पकड प्रीतम मायंगडे (अंत्राळदेवी मानसकोंड)व उत्कृष्ट खेळाडू म्हणून सोहम भोसले (अंत्राळदेवी मानसकोंड) याना आकर्षक बक्षिस देण्यात आले.