(मंबई)
खारघर दुर्घटना प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील नितीन सातपुते यांनी दाखल केलेल्या या याचिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र भूषण हा शासकीय पुरस्कार असल्यामुळे जनतेचा पैसा यामध्ये अयोग्य पध्दतीने वापरला असा आरोप याचिकेत केला आहे. राजकीय फायद्यासाठी १० लाख लोकांना कार्यक्रमासाठी बोलावण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. व्हीआयपी पाहुणे एसीमध्ये जेवले, तर लोकांना मरण्यासाठी सोडून दिले गेले, असेही याचिकेत म्हणण्यात आले आहे.
इतक्या मोठ्या संख्येनं लोकं येणं अपेक्षित असताना कार्यक्रमाचं ढिसाळ आयोजन, उन्हापासून संरक्षण देणाऱ्या व्यवस्थेचा अभाव, पाणी, वैद्यकीय सुविधा या दुर्लक्ष हे सारे मुद्दे याचिकेतून उपस्थित केले गेले आहेत. या घटनेनंतर राज्य सरकारनं संबंधित श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना तातडीनं आर्थिक मदत जाहीर केली. याशिवाय या कार्यक्रमासाठी १४ कोटी रूपये शासनाच्या तिजोरीतून खर्च केल्याचा आरोपही केला जात आहे. यासंदर्भात ही जनहित याचिका दाखल झाली असून दोषींवर कारवाई करा, या मागणीसह जनतेचा हा पैसा आयोजकांकडून वसूल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
खारघरमधील या दुर्घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडीओ हे कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांची व्यवस्था अपूर्ण झाल्याचे तसेच काही व्हिडीओ आपल्याला अस्वस्थ करणारे आहेत. संबंधित व्हिडीओ पाहिल्यानंतर कदाचित गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन काही लोकांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज बांधला जात आहे. तर काहींचा उष्माघातानेच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे.
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यान उष्माघातामुळे आतापर्यंत 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवरुन विरोधकांकडून सातत्याने सरकारवर निशाणा साधला जात आहे. याप्रकरणी वेगवेगळे दावे-प्रतिदावे आणि आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. असं असताना आता हा वाद मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे.