(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा दीक्षाभूमी येथील बावीस खेडी बौद्धजन संघ यांचेवतीने विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी आणि त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची 125वी शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती असा संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषी वातावरणात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी विशेष करमणुकीच्या कार्यक्रमात संघटनेच्या दीक्षाभूमी कलामंच वाटद-खंडाळा निर्मित भीम- रमाई जल्लोष जयंतीचा हा रेकॉर्ड डान्स कार्यक्रम यंदा महिला भगिनींच्या विविध नृत्याविष्कारांनी चांगलाच गाजला.
या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला. वाटद खंडाळा येथील दीक्षाभूमी बुद्ध विहाराच्या भव्य रंगमंचावर झालेल्या भीम- रमाई जयंती जल्लोष कार्यक्रमाचे यंदा प्रथमच संपूर्ण नियोजन बावीस खेडी बौद्धजन संघाच्या महिला मंडळाकडे देण्यात आले होते. यावेळी प्रारंभी दीक्षाभूमी वाटद खंडाळा येथील बावीस खेडी बौद्धजन संघटनेच्या अखत्यारीत असलेल्या महिला मंडळाच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आल्यानंतर त्यामध्ये विविध मान्यवरांचा यथोचित सन्मान व स्वागत करण्यात आले. त्यानंतर झालेल्या बहारदार कार्यक्रमात बावीस खेडी गाव शाखांमधील वाटद, जयगड चाफेरी, कासारी, सैतवडे, मालगुंड, वरवडे, निवेंडी, भगवतीनगर कोळीसरे, गडनरळ, आगरनरळ, कळझोंडी आदी गावातील महिला भगिनींनी बुद्ध- भीम-रमाई गीतांवर आधारित विविध नृत्याविष्काराने रसिक प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली. तसेच याच कार्यक्रमातून भीम- रमाई संंयुक्त जयंतीचा मोठा जल्लोष खऱ्या अर्थाने करण्यात आला.
या संपूर्ण कार्यक्रमाचेे बहारदार निवेदन बावीस खेडी बौद्धजन संघाचे उपचिटणीस तथा सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख प्रशांत मोहिते यांनी केले. तर हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुकेशनी कांबळे व बावीस खेडी बौद्धजन संघटनेचे अध्यक्ष भाई जाधव आणि सभापती रजत पवार यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली सर्व प्रमुख पदाधिकारी व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.