(दापोली)
दापोली तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या सदस्य पदासाठी पोटनिवडणुकीचा जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमात आंजर्ले ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली नव्हती. या प्रकरणी दापोली पंचायत समिती दापोलीचे गटविकास अधिकारी व तहसील कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यभार असेलेले लिपिक यांना नोटीस देण्यात आली आहे. दापोलीच्या नूतन तहसीलदार अर्चना बोंबे यांनी ही माहिती दिली.
आंजर्ले ग्रामपंचायतीमधील एका सदस्याच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागी निवडणूक घेण्यात यावी असे जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी लेखी आदेश देवूनही तेथे पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात नव्हता. या संदर्भात आंजर्लेचे रहिवासी व भाजपचे तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर यांनी दापोलीच्या तहसीलदार यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली होती.
दापोली तालुक्यातील आंजर्ले ग्रामपंचायतीचे सदस्य आशिष मोहन रहाटवळ यांचे निधन झाल्यावर या ग्रामपंचायतीच्या सरपंच यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार व गट विकास अधिकारी यांना २२ जून २०२२ रोजी पद रिक्त झाल्याची लेखी माहिती दिली होती. या पत्राचा संदर्भ देवून जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना ४ जुलै २०२२ रोजीच्या पत्राने सदरचे पद रिक्त झाल्याने ते भरण्याची कार्यवाही पुढील निवडणूक कार्यक्रमाद्वारे करण्यात यावी असे कळविले होते.
या पत्राची प्रत गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांनाही पाठविण्यात आली होती. असे असतानाही दापोली तालुक्यात जाहीर झालेल्या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमात आंजर्ले ग्रामपंचायतीचा समावेश केलेला नव्हता. पुढील काळात ग्रामपंचायतिचा पोटनिवणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, तेव्हा प्राधान्याने आंजर्ले ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या ठिकाणी निवडणूक घेण्यात येईल अशी माहिती तहसीलदार अर्चना बोंबे यांनी दिली आहे.