(लांजा)
लाईनमध्ये बिघाड झाल्याने आरगाव येथील कंत्राटी वायरमन लाईन दुरुस्त करण्यासाठी दुचाकीवरून जात असताना रानडुकराने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वाराच्या डोक्याला जबर मार बसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्याना उपचारासाठी रत्नागिरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढील आठ महिने त्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष चालू राहिला. अखेर १४ एप्रिल रोजी त्यांची प्राणज्योत मावळली. या सर्व प्रकरणात महावितरण व वनविभागाने फक्त बघ्याची भुमिका घेतली असुन त्यांच्या मृत्यु नंतर तरी त्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली जात आहे. मात्र वनविभाग आणि महावितरण याकडे दुर्लक्ष करत आहे. महावितरणला लाईन दुरुस्तीसाठी कामगार हवेत मात्र त्यांची जबाबदारी नको असा संतप्त येथील नागरिक करत आहेत.
तालुक्यातील आरगाव येथे स्थित कंत्राटी वायरमन नंदकुमार खामकर हे गेली कित्येक वर्षे कंत्राटी तत्वावर महावितरण मध्ये कार्यरत होते. दि. २८ जुलै २०२२ रोजी संध्याकाळी त्यांना फोन आला. त्यावेळी रिंगणे येथील लाईन नादुरुस्त झाल्याचे सांगण्यात आले. ते ताबडतोब आपल्या दुचाकीवरून निघाले. आरगाव व रिंगण्याच्या शिमेनजिक त्यांच्या दुचाकीला रानडुकरानी धडक दिली या धडकेने ते कोसळले त्यांच्या डोक्याला जबर मार बसला. त्यानंतर त्याना उपचारासाठी रत्नागिरी येथे नेण्यात आले तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पुढील आठ महिने सातत्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. यात लाखो रुपये खर्च करण्यात आले. कुटुंबाने आपली सारी जमापुंजी त्यांच्या उपचारासाठी खर्च केली. ते बरे होतील अशी भाबडी आशा असताना दि.१४ एप्रिल २०२३ रोजी त्यांची प्राणज्योत मावळली. घरचा कर्ता माणुस गेला शिवाय त्यांच्या उपचारासाठी घरची सारी जमापुंजी सुध्दा गेली याने कुटुंब आर्थिक दृष्ट्या संकटात सापडले आहे. कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे.
या सर्व प्रकरणात ते ज्या महावितरणचे कंत्राटी कर्मचारी होते, त्या महावितरणने केवळ बघ्याची भुमिका घेतली. कामावर असताना अपघात झाला असल्याने आर्थिक मदत करणे गरजेचे होते. मात्र महावितरणने हात वर केले आहेत. तर वन्य प्राण्याने धडक देऊन अपघात झाल्याने वनविभागाने दखल घेऊन मदत करणे गरजेचे असताना आपण त्या गावाचे नाहीच ही भुमिका वनविभागाने घेतली आहे. तरी आर्थिक मदत करण्याची मागणी सर्वच स्तरातून केली जात आहे.