(मुंबई)
अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राज्याचे केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने केला असून त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र दिले आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारला घेरलं असून प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले आहे की, अशा भ्रष्टाचाराला व भ्रष्टाचार करणार्या मंत्र्यांला पाठीशी घालणार की त्याची मंत्री पदावरून हकालपट्टी करणार हे जनतेसमोर जाहीर करा, याचा तपास आर्थिक गुन्हा अन्वेशन विभागाकडे द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचे PS, OSDऔषध विक्रेत्यांकडे प्रचंड पैसे मागत असल्याचा गंभीर आरोप केमिस्ट ड्रगिस्ट संघटनेने केला आहे. तशा आरोपांचे पत्र या संघटनेच्या राज्यसचिव अनिल नावंदर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.
यावर संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, औषध विक्रेता संघाने योग्य कारवाईला विरोध करू नये. भ्रष्टाचारी औषध विक्रेत्यांच्या पाठीशी न राहता शासनास सहकार्य करावे. अशा पद्धतीचे आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणे चुकीचे आहे, अधिकारी नियमाचे पालन करून कारवाई करतात, प्रादेशिक अधिकाऱ्याने कारवाई केल्यानंतर प्रकरण मंत्रालयात येतात. खालच्या अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई चुकीची आहे, असं समजून मी स्टे दिल्यास आमच्या अधिकाऱ्याचं मनोधैर्य खच्चीकरण होते. म्हणून प्रत्येक प्रकरणात विचार करून मी निर्णय देत असतो. मला या ठिकाणी संघटनेने सहकार्य करावे, असे संजय राठोड यांनी म्हटले आहे.