(हैदराबाद)
मुंबई इंडियन्स आणि हैदराबाद सनरायझर्स यांच्यात मंगळवारी झालेल्या २५ व्या आयपीएल सामन्यात मुंबईचा १४ धावांनी विजय झाला. त्यामुळे हैदराबादच्या संघाला धक्का बसला. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांची सुरुवात फारशी चांगली झालेली नाही. कारण दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी दोन सामने गमावलेले आहे. त्यामुळं आजचा सामना जिंकून स्पर्धेत लय मिळवण्यासाठी रोहित आणि मार्करम प्रयत्न करताना दिसणार आहेत.
हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात हैदराबादने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकांत ५ गडी गमावून १९२ धावा केल्या. मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला १९.५ षटकांत सर्व गडी गमावून १७८ धावाच करता आल्या. त्यामुळे हैदराबादचा १४ धावांनी पराभव झाला.
हैदराबादची सुरूवात खराब झाली. त्यांचे दोन गडी २५ धावांतच बाद झाले. नंतर मयांक अग्रवालने एडन मार्करमसोबत डाव पुढे नेला. दोघांनी तिस-या गड्यासाठी ४६ धावांची भागीदारी केली. मार्करम २२ धावा काढून ग्रीनच्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर पुढच्याच षटकात अभिषेक शर्माही १ धाव काढून पीयूष चावलाच्या चेंडूवर बाद झाला.
यानंतर हेन्रिक क्लासेन आणि मयांक अग्रवालने फटकेबाजी करत धावसंख्या पुढे नेली. मात्र चौदाव्या षटकात चावलाने क्लासेनला झेलबाद केले. क्लासेनने ३६ धावा केल्या तर पुढच्याच षटकात रिले मेरेडिथने मयांक अग्रवालला बाद केले. त्याने ४८ धावा केल्या. यानंतर आलेला यान्सेन १३ धावा करून बाद झाला. त्याचीही विकेट रिले मेरेडिथने घेतली तर टिम डेव्हिड अठराव्या षटकात १० धावांवर धावबाद झाला. विसाव्या षटकात अब्दुल समद धावबाद आणि भूवनेश्वर कुमार झेलबाद झाला. समदने ९ तर भूवनेश्वरने २ धावा केल्या. त्यामुळे १९.५ षटकांत हैदराबादला सर्व गडी गमावून १७८ धावाच करता आल्या.
तत्पूर्वी मुंबईने प्रथम फलंदाजी करीत निर्धारित २० षटकांत १९२ धावांपर्यंत मजल मारली होती. मुंबईकडून कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक नाबाद ६४ धावा केल्या. त्यानंतर ईशान किशनने ३८, तिलक वर्माने ३७, रोहित शर्माने २८, टिम डेव्हिडने १६ धावा केल्या. हैदराबादकडून मार्को यान्सेनने २ विकेट घेतल्या तर भूवनेश्वर कुमार आणि टी नटराजनने प्रत्येकी १ विकेट घेतली.