(रत्नागिरी)
शहराजवळील भाट्ये येथील खाडीत बुडून बालकासह तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. १६) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. दुर्घटना घडलेल्या ठिकाणी समुद्राचे पाणी खाडीत येण्याचा मार्ग असल्याने वाळू कापली जाते आणि अचानक खोल खड्डा तयार होतो. त्याच ठिकाणी दोघेही पोहण्यासाठी उतरल्यामुळे हा प्रकार घडला. रेहान अब्दुल्ला शेख (११, रा. क्रांतिनगर झोपडपट्टी, रत्नागिरी) आणि प्रणय रघुनाथ जाधव (२४, कोकणनगर मराठी शाळेजवळ, रत्नागिरी) अशी बुडून मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत मतीन अमीरुद्दीन सोलकर (३८, रा. राजीवडा नाका, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास यातील रेहान शेख आणि त्याच्यासोबत असलेला प्रणय जाधव भाट्ये येथील खाडीत पोहायला उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडू लागले. दोघेही बुडत असल्याचे पाहिल्यानंतर जवळच उभ्या असलेला अबुबखर अब्दुल्ला शेख या मुलाने ओरडा करताच आजूबाजूच्या परिसरात जाळे विणत असणाऱ्या मच्छीमारांनी धाव घेतली. त्या मुलाचे ओरडणे ऐकून राजीवडा येथील अमीरुद्दीन सोलकर यांनी दिलदार कासम पावसकर यांच्या मदतीने पाण्यात उडी मारली. त्यांनी रेहान शेख आणि प्रणय जाधव यांना खाडीच्या पाण्यात बुडताना बाहेर काढले. दोघांच्याही नाकातोंडात पाणी गेल्याने ते दोघेही बेशुद्ध झाले होते. त्यांना तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दुपारी साडेतीनच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातील डॉ. गोविंद आंबाडे यांनी दोघांनाही मृत घोषित केले. पोटात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेबाबत माहिती मिळताच शहर पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान, दोघांचेही नातेवाईक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार या परिसरात मच्छी पकडण्यासाठी ती मुले भाट्ये येथे आल्याचे समजते. दोघांच्या मृत्यूमुळे कोकण नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.