(नवी दिल्ली)
कुख्यात गँगस्टर अतिक आणि अशरफ अहमद या दोघांची प्रयागराजमध्ये शनिवार १५ एप्रिल रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. माध्यम प्रतिनिधींच्या घोळक्यात आपण पत्रकार असल्याचे भासवत या हल्लेखोरांनी दोघांवर हल्ला केला. या प्रकारामुळे पत्रकारांची सुरक्षा धोक्यात आली आहे. भविष्यात पुन्हा अशा घटना घडू नये याकरता केंद्रीय गृहमंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून लवकरच पत्रकारांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्वे आणि मानक कार्यप्रणाली जारी करण्यात येणार आहे.
शनिवारी संध्याकाळी अतिक आणि अशरफ यांना अस्वस्थ वाटू लागल्याने एसएचओ मौर्या यांच्या नेतृत्वाखालील २० पोलिसांच्या पथकाच्या सुरक्षेत त्यांना मोतीलाल नेहरू झोनल हॉस्पिटलमध्ये (कॉल्विन) वैद्यकीय तपासणीसाठी नेले जात होते. यावेळी पोलिसांच्या पथकात सात उपनिरीक्षक आणि १३ हवालदारांचा समावेश होता. हॉस्पिटलच्या गेटवर माध्यमांना पाहिल्यानंतर अतिक आणि अशरफ हळू चालायला लागले. यावेळी पत्रकारांनी दोघांनाही प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. माध्यमांचे कॅमेरे दोघांकडे लागलेले होते. तेवढ्यात पत्रकारांच्या गर्दीत असलेल्या दोघांनी अतिक आणि अशरफवर गोळ्या झाडल्या. त्यांच्या डोक्यावर गोळी लागल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर दोन्ही हल्लेखोर आणि त्यांचा साथीदार पोलिसांना शरण गेले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर दुचाकीने आले होते. घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून एक व्हीडीओ कॅमेरा जप्त केला. तसेच तिथे एका वृत्तवाहिनीचाही लोगो त्यांना सापडला आहे. दरम्यान, एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी दावा केला आहे की, हल्लेखोरांनी अतिक आणि अशरफवर गोळीबार केल्यानंतर तिथे ‘जय श्री राम’च्या घोषणाही दिल्या होत्या.