(रत्नागिरी)
शहरात शनिवारी सायंकाळी लव्ह जिहाद, लॅंड जिहाद, अवैध प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांचा आवाज, गोहत्या, धर्मांतरण याविरोधात सकल हिंदू समाजातर्फे विराट हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला. सुमारे पाच हजारांहून अधिक हिंदू बंधू, भगिनी मोर्चात सहभागी झाले. तर लक्ष्मीचौक येथे झालेल्या सभेला विराट गर्दी झाली. महाराष्ट्रात गोहत्या, लव्ह जिहाद आणि धर्मांतरण याबाबतचे कायदे त्वरीत व्हावेत, अशी मागणी या वेळी करण्यात आली. महाराष्ट्रात याकरिता ४० मोर्चे काढण्यात आले.
भगवे ध्वज, पांढरा झब्बा लेंगा अशी पारंपरिक वेशभूषा करून मोर्चेकरी सहभागी झाले. मारुती मंदिर येथे आरती करून आणि हनुमंताचे पूजन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत पूर्णाकृती मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या मोर्चामध्ये जातीपाती भेद व पक्षभेद विसरून हिंदू धर्मीय मोठ्या संख्येने एकत्र आले आणि शक्तीप्रदर्शन करण्यात आले. मोर्चादरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
हिंदू गर्जना मोर्चाची सुरवात श्री शिवतीर्थ मारूती मंदिर येथे झाल्यानंतर मोर्चा मारूती मंदिर, माळनाका, जयस्तंभ, राम आळी, गोखले नाका येथे पोहोचला. माळनाका येथे अद्वैत पेट्रोलियम येथे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
लव्ह जिहाद, धर्मांतरणामुळे महाराष्ट्रात हिंदू समाजाच्या लेकी, सुना कधी नव्हे एवढ्या असुरक्षित झाल्या आहेत. कोणती हिंदू मुलगी अथवा महिला लव्ह जिहादला कोणत्या क्षणी बळी पडेल याची शाश्वती उरलेली नाही, असे सांगत हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी हिंदू महिलांनी एकी दाखवली. त्यामुळे मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.
घोषणांनी आसमंत दुमदुमले…
हिंदू गर्जना मोर्चामध्ये जय भवानी जय शिवाजी अशा हिंदुत्ववादी घोषणांनी आसमंत दुमदुमले. गोहत्या बंदी हीच हिंदू राष्ट्राची नांदी, हिंदूनो आपल्या भागातील तरुण लव्ह जिहादला बळ पडू नये यासाठी कटिबद्ध व्हा, धर्मरक्षण करा, लव्ह जिहाद प्रतिबंधक कायदा झालाच पाहिजे, धर्मांतरण प्रतिबंधक कायदा झालाच पाहिजे, गाय हमारी माता है, असे फलक झळकले होते.